हुल्लडबाज दुचाकीस्वारांमुळे अपघातात वाढ

0

महेश गोडगे

मोहोळ शहरात व परिसरात तरुण दुचाकीस्वारांची हुल्लडबाजी वाढत आहे. रविवारी बाजाराचा दिवस असल्याने सर्वच मार्गांवर पायी ये-जा करणाऱ्यांची गर्दी जास्त असते. त्यात ह्या हुल्लडबाज तरुणांच्या धूम स्टाईल दुचाकी चालविण्याने अपघात वाढले आहेत. मोहोळ मधून विजापूरकडे जाणाऱ्या मार्गावर तर छोट्या मोठ्या दुचाकी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कमी वयाच्या मुलांना सुसाट वेगात गाडी चालविण्याची मोठी हौस वाटते. मात्र, ह्यांची हौस जीवघेणी ठरत आहे.रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका तरुण दुचाकीस्वाराने पिता पुत्रास पाठीमागून जोराने धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर आडवे पडले व वेदनेने विव्हळू लागले. अवजड वाहनांच्या रहदारीचा हा मार्ग असल्याने लागलीच ट्रॅफिक जामचा त्रास सामान्य जणांना सहन करावा लागला. अपघात स्थळी जमलेल्या लोकांनी जखमी पितापुत्रास दवाखान्यात पाठवून त्या तरुणास बेदम चोप दिला. मात्र, चोप देऊन हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. ह्या मार्गावर सकाळच्या वेळी तर कॉलेजला जाणारी तरुणाई खूपच वेगाने गाड्या उडवीत असल्याचे रोजच निदर्शनास येत आहे. कॉलेजच्या बहुसंख्य विद्यार्थिनी पायी जात असल्याने ह्या रोड रोमिओंची हुल्लडबाजी वाढत आहे. याचा त्रास मात्र इतर दुचाकीस्वारांना व वाहनधारकांना होत आहे.फक्त वेगात दुचाकी चालविणे एवढ्यावरच ही हुल्लडबाजी थांबत नाही तर आपल्या गाडीचे कर्णकर्कश हॉर्न सतत वाजवीत गाडी चालवितात. त्यामुळे ध्वनीप्रदूषणाबरोबरच अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असून ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या मानसिक स्थितीवरही त्याचा परिणाम होत आहे. बेदरकार दुचाकी चालविणार्‍या स्टंटबाज युवकांमुळे त्यात आणखी भर पडत असल्याने हुल्लडबाज तरुणाईला आवर घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरुन एकाग्रपणे वाहन चालविताना अचानक प्रेशर हॉर्न वाजण्यामुळे बिचकल्यासारखे होते. आपले काही चुकले नाही ना यासाठी पुढचा वाहनचालक दुचाकी वेगात असतानाही  मागेपुढे  पाहतो. या काळात लक्ष विचलित झाल्यामुळे रस्त्यांच्या परिस्थितीकडे, दुचाकीच्या वेगाकडे दुर्लक्ष होते. तोल जाण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे चित्र आहे. हुल्लडबाजी आणि आपल्याकडे लक्ष जावे यासाठीच हे युवक कर्णकर्कश हॉर्न आपल्या गाडीला लावत आहेत. स्टेट बँक ते जुना टोल नाका या मार्गावर खड्डयांचे प्रमाण वाढल्याने खड्डे चुकविण्यासाठी जो-तो प्रयत्न करतो अन अशातच अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. संबंधित विभागाने या मार्गावरील खड्डे बुजविण्याची व तरुणाईच्या हुल्लडबाजीतून होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाईची भूमिका घेण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here