महाराष्ट्रात लोक बदल करण्याच्या मन:स्थितीत- शरद पवार

0

 

कोल्हापूर : महाराष्ट्रातील चौदा-पंधरा जिल्ह्यात आतापर्यंत जावून आलो. सभांना मिळणारा प्रतिसाद आणि लोकांच्या चेहऱ्यांवरील भाव पाहता या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीस अनुकूल वातावरण तयार होत असून लोक बदल करण्याच्या मनस्थितीत असल्याचे निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे नोंदविले. राष्ट्रवादाबद्दल उत्तर तुम्ही द्यायला हवे ते सोडून तुम्ही मला कसले प्रश्न विचारता? अशीही विचारणा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सोडून मी अजून देशात गेलेलो नाही. त्यामुळे देशातील राजकीय स्थितीबद्दल सांगता येणार नाही परंतु राज्यातील चित्र दिवसेंदिवस काँग्रेस आघाडीला अनुकुल होत आहे. एखाद्या राज्यातील प्रचाराला पंतप्रधान एकदा किंवा दोनदाच येतो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत कारण त्यांच्या हे लक्षात आले आहे. त्यांच्या प्रत्येक सभेत आता पवार यांच्यावर टीका हा कॉमन अजेंडा झाला आहे. आपलं बरं चाललंय हाच त्याचा अर्थ आहे. त्यांनी अगोदर पवार कुटुंबियांवर व्यक्तिगत हल्ला केला; परंतु त्यास प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर त्यांचा टोन सुधारला. माझ्याबद्दल बरं बोलायचे परंतु संभ्रम निर्माण होईल असे प्रश्न उपस्थित करायचे, असा मोदी यांचा प्रयत्न आहे.
तुमच्या पक्षाने काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली होती. माझ्या पक्षाची किंवा काँग्रेसनेही मुफ्ती यांच्या पक्षाबरोबर कधीच आघाडी केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादाबद्दल उत्तर तुम्ही द्यायला हवे ते सोडून तुम्ही मला कसले प्रश्न विचारता..? गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही काश्मीरमधील जनतेसमोर विकासाचा कार्यक्रम ठेवला परंतु गेल्या पावणेपाच वर्षात त्यातील एकाही गोष्टीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे तेथील तरुणपिढीमध्ये संतप्त भावना आहे, असे ते म्हणाले.
हे सीमेवरचे व अत्यंत संवेदनशील राज्य आहे. तिथे अनेक निर्णय संयमाने घ्यायला हवेत. जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी न झाल्याने स्थानिक तरुणांतून काही वेगळी भावना व्यक्त होत असेल तर तो दोष पंतप्रधान म्हणून तुमचा आहे. ते दुसऱ्यांवर ढकलण्याचाप्रयत्न आहे म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत. भारताच्या घटनेने एक पंतप्रधान दिला असताना दोन पंतप्रधान आले कोठून..? मोदी या प्रश्नांत देशाला चुकीच्या दिशेने नेत आहेत, असे पवार यांनी सांगितले.

हवा बदलेल तसे बदलतात ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य असायचे परंतु ते सातत्य उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत नाही. हवामान बदलेल तसे ती भूमिका बदलत असल्याचा टोला पवार यांनी लगावला.

विधानसभेला राज ठाकरे यांच्याशी चर्चा होऊ शकते
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे ‘मोदी-अमित शहा यांना घालवा’ ही भूमिका घेऊन प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा लाभ त्या-त्या स्थानिक उमेदवारांना होईल. लोकसभेला आमची त्यांच्याशी कोणतीही आघाडी नाही परंतु राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार घालविण्यासाठी विधानसभेला त्यांना आघाडीत
घेण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा होऊ शकते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here