मनगटातील ताकदीपेक्षा मतदारांची शक्ती मोठी : प्रा. मंडलिक

0

 

गारगोटी (प्रतिनिधी) :

माझ्या मनगटातील ताकदीच्या जिवावरच मी खासदार झालो, निवडणुकीत कोणत्याही पैलवानाच्या छातीवर मी बसू शकतो अशी वल्गना करणार्‍या खा. महाडिकांना माहित नाही कि राजकारणात मनगटाच्या ताकदीपेक्षा मतदारांची शक्ती महत्वाची असते. जिल्ह्याच्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात महाडिकांना कोणी ना कोणी मदत केल्यानेच महाडिकांची राजकारणात विषवल्ली फोफावत गेली आहे. येत्या निवडणूकीत महाडिकांची विषवल्ली जनताच मुळासकट उखडून टाकेल असे प्रतिपादन प्रा. संजय मंडलिक यांनी केले.

नाधवडे (ता. भुदरगड) येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, पं. स. सभापती स्नेहल परिट, पं. स. सदस्य अजित देसाई, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, बिद्रीचे माजी संचालक दताजीराव उगले, शिवसेना राधानगरी मतदारसंघ संपर्क प्रमुख दिनानाथ चौगले आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, संधिसाधू राजकारण करित महाडिकांनी विविध पक्षातून अनेक पदे मिळविली. पण जनता आता सुज्ञ झाली आहे. फक्त विकासकामांच्या गप्पा मारण्यात पटाईत असलेले महाडिक मनगटातील ताकदीची व पैशाची भाषा करत आहेत. त्यांना मतदारच त्यांची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, स्व. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी लोकहितासाठी कायदा मोडून कूर उपकालव्याची निर्मिती केली. यामुळे भूदरगडच्या पूर्व भागातील जनतेचे हरित क्रांतीचे स्वप्न साकारले गेले. कूर उपकालव्याच्या अस्तरिकरणासाठी भरीव निधी लवकरच मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील असून स्व. मंडलिकांच्या विचारांवर व कर्तृत्वावर जिवापाड प्रेम करणारी भुदरगडची जनता त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही. त्यांमुळे येत्या निवडणुकीत येथील जनता प्रा. मंडलिकांच्या पाठीशी ताकदीने उभी राहिल.

यावेळी दिनानाथ चौगले, श्रीकांत कांबळे,जयवंत वायदंडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सरपंच कांचन वायदंडे, उपसरपंच दिपाली पाटील, धनाजीराव खोत, बाळ गिरी, डी. डी. परिट, कृष्णात खतकर, ग्रा. पं. सदस्य अनिल पाटील, शामराव पाटील, हिंदूरराव पाटील, पो. पाटील लता देसाई, पी. एस. पाटील, संजय पाटील, सतिश कोळी, रायाण्णा वायदंडे, शरद वैरट, सुनील पाटील, कृष्णात पाटील, शहाजी देसाई, बी. एम. पोतदार, संजय सुतार आदीसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत ग्रा. पं. सदस्य अमर पाटील यांनी केले. आभार बाबूराव पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here