शिवसेना सत्तेत आल्यास कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणू  – उद्धव ठाकरे

0

पूनम पोळ

कोल्हापूर – राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी  येथील जाहीर सभेत सांगितले. तुम्ही कोल्हापूरला सारखे मंत्रिपद मागता, तुमच्या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे, त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले? अशी विचारणा करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.

ठाकरे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा शुक्रवारपासून सुरू झाला. या दोन दिवसांच्या दौ-यात त्यांच्या पाच जाहीर सभा असून मुख्यत: ते शेतकरी, कामगार, उद्योजक अशा घटकांशी बोलणार आहेत. राज्यात ते सत्तेत वाटेकरी आहेत व त्यांचा दौरा मात्र सरकारच्या कारभाराची वाभाडी काढण्यासाठी आहे. कोल्हापूर शहरातही सगळीकडे त्यांचे डिजिटल फलक झळकत आहेत. शुक्रवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात असताना ठाकरे यांच्या दौ-याची हवा निर्माण करण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे.

नेसरीतील सभेला सुमारे दहा हजारांहून जास्त लोक उपस्थित होते. तिथे बोलताना ठाकरे म्हणाले,‘कर्नाटकचा मुख्यमंत्री कानडी आलीच पाहिजे असे म्हणतो परंतू मराठी आलीच पाहिजे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत नाहीत हेच खरे दुर्देव आहे. शिवसेना सीमाभागातील मराठी माणसाच्या मागे कायमच ताकदीने उभी राहिली आहे. ती यापुढेही त्यांना बळ देईल. तुम्ही लोकांनी आज या सभेच्या निमित्ताने चंदगड भगवे करून दाखविले परंतू तेवढ्याने भागणार नाही. शिवसेनेला राज्याची सत्ता द्या. कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही.शिवेसेनेचे कोल्हापुरात सहा आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपदाची मागणी होते. मागणी करण्यात गैर नाही परंतू तुमच्या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे. ते बिनकामाचे आहे. त्यांचा जिल्ह्यासाठी काय उपयोग झाला हे कोल्हापूरकरांनी त्यांना विचारायला हवे, असेही ठाकरे यांनी सुनावले.

 

 पवार यांच्या गुप्त भेटीबद्दल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माझी गुप्त भेट झाली. परंतु त्या भेटीबद्दल कुठेच वाच्यता करायची नाही असे ठरले होते.  तरीही पवार यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता केली. आम्हाला भेटल्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांनाही भेटले परंतु हा बाबा तिथे तरी शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल काहीतरी बोलेल असे वाटले होते, पण ते तिथे बोलले ते एमसीए बद्दल…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here