चंदगड तालुक्यातील होसूर पाझर तलाव कामाच्या चौकशीचे आदेश

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

चंदगड तालुक्यातील होसूर पाझर तलाव कामातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी ग्रामविकास प्रशासनास दिले आहेत. यामुळे लघुपाटबंधारे प्रशासनात खळबळ उडाली आहे. झालेल्या गैरकारभारावर पडदा टाकून उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा डावही फसणार आहे.

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीमधून तलावासाठी ८० लाख निधींची तरतूद २०१२ मध्ये करण्यात आली. पाझर तलाव बांधकाम करण्यासाठी तांत्रिक यंत्रणा नसल्याने हे अनुदान जलसंधारणच्या लघुपाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्यात आला. यानुसार १५ डिसेंबर २०१२ मध्ये मुख्य अभियंत्यांनी ७३ लाखांच्या कामांना अंतिम मान्यता दिली. मूळ नियोजनानुसार २२ शेतकऱ्यांची जमीन संपादीत करून तलाव बांधण्यास कोणाचा विरोध नव्हता आणि आताही नाही. मात्र ठेकेदाराने दादागिरी करीत तलावाची जागाच बदलली. केलेल्या कामाची चौकशी आणि वस्तुनिष्ठ पाहणी न करता ठेकेदाराला ३० लाखांचे बिल अदा करण्यात आले. सरकारच्या लेखापरीक्षकाने ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार वसुली करावी, अशी मागणी तक्रारदार सुबराव पवार यांनी प्रशासनाकडे केली. त्यासाठी ते वारंवार पाठपुरावा करीत आहेत. पण लालफितीच्या कारभारामुळे नुकसानीची रक्कम वसूल करण्यातही टाळाटाळ होत असल्याचा आरोप पवार यांचा आहे. गंभीर तक्रारी असतानाही पुन्हा दाबून काम सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यास स्थानिक बाधीत शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या प्रकाराने प्रशासनाचा आंधला कारभार पुढे आला आहे. मात्र चौकशीच्या प्रकाराने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here