‘ होलीक्रॉस ‘ने जातीय आंदोलन करणे थांबवावे : आम.राजेश क्षीरसागर

तोडफोड प्रकरण : होलीक्रॉस प्रशासनाची चौकशी करा

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
होलीक्रॉस स्कूलसंदर्भात युवा सेनेने केलेले आंदोलन फीवाढीविरोधात होते, पण प्रशासनाने युवासैनिकांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ख्रिश्चनधर्मियांचा मोर्चा काढून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. होलीक्रॉस स्कूल प्रशासनाकडून आंदोलनाला जातीय रंग दिला जात आहे. त्यांनी विद्यार्थी, पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांची पळता भुई थोडी करू, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.
होलीक्रॉस तोडफोड प्रकाराला प्राचार्याच जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करा, त्यांची बदली करा, अशीही मागणी केली. पालकांकडून भरमसाठ फी घेणाऱ्या ‘होलीक्रॉस ‘ वर शिक्षण विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.
येथील प्रेस क्लबमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दीपक गौड, मंगला साळुंखे, पूजा भोर, धनाजी दळवी, अमर समर्थ, जयवंत हारुगले, उदय भोसले आदी उपस्थित होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इमारत निधीच्या नावाखाली अचानक ७ हजारांची वसुली विद्यार्थी, पालकांकडून होत असल्याची तक्रार युवा सेनेला मिळाली. यासंदर्भात युवासेनेने शाळा प्रशासनाला निवेदन दिले होते. तरीही इमारत निधीसाठी पालकांवर दबावाच्या तक्रारी आल्या. युवा सेनेने शाळा प्रशासनास याचा जाब विचारला, पण शाळा प्रशासनाने उद्धट प्रतिसाद दिला, त्याचीच प्रतिक्रिया युवा सेनेच्या आंदोलनातून उमटली. या तोडफोड प्रकरणाला प्राचार्याच जबाबदार आहेत. त्यांची बदली करावी, अशी मागणी केली.
होलीक्रॉस तोडफोडप्रकरणी खोटी माहिती देऊन शाळा प्रशासनाकडून युवा सेनेच्या बदनामीचा प्रकार सुरु आहे. युवा सैनिकांवर कारवाईसाठी निघालेल्या मोर्चात ख्रिश्चन धार्मियांतील प्रमुख सामील झाले, त्यांच्याकडून भावना भडकवण्याचे काम सुरु आहे. बिल्डिंग फंडच्या नावाखाली स्वतःचा विकास साधणाऱ्या प्राचार्यांची चौकशी करावी, युवा सेनेचे आंदोलन कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. होलीक्रॉस शिक्षण संस्थेच्या हुकूमशाहीविरोधात आहे. याबाबत सोशल मीडियातून आवाज उठवणाऱ्या पालकांना शाळेत बोलावून धमकावण्यात आले. शासनाचे सर्व नियम धाब्यावर होलीक्रॉस संस्थेचा मनमानी कारभार सुरु आहे. असे ते म्हणाले.
मोर्चामागील म्होरक्यांवर गुन्हे दाखल करा
आंदोलनानंतर युवा सैनिकांवर कारवाईसाठी शाळा प्रशासनाकडून पालक, विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. या प्रकरणाला जातीयवादी रंग देण्याचे काम काही राजकीय म्हारेक्यांकडून सुरु आहे. मोर्चामागील या म्होरक्यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून असल्याचे त्यांनी सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here