पनवेल मनपाने पुन्हा थकवले 384 कामगारांचे वेतन

कामगारांचा आंदोलनाचा इशारा

0

पनवेल महानगरपालिकेच्या 384 कामगारांना गेल्या तीन महीन्यांपासून पगार मिळालेला नसल्यानं नोकरी असून देखील बेरोजगार व्हायची पाळी या कामगारांवर आल्यानं या कामगारांनी मनपा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान 1 ऑक्टोबरला पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील कामगारांचा देखील पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र या कामगारांना पगार देताना मनपा प्रशासन चालढकल करत असून मनपा स्थापन झाल्यानंतर देखील सहा महिने या कामगारांना पगार मिळाला नव्हता. त्यानंतर आयुक्तपदी राजेंद्र निंबाळकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर या कामगारांना सहा महिन्यांचा पगार देण्यात आला.मात्र निंबाळकर आयुक्त पदावरून गेल्यानंतर पुन्हा एकदा या कामगारांचा पगार रोखण्यात आला आहे… दरम्यान सध्या शाळांचे दिवस सुरू असल्याने कामगारांना आपल्या मुलांना वह्या,पुस्तक,कपडे घेणं गरजेचं आहे..त्यातच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे कामगारांचा पगारच रोखल्याने, आता मुलांचे शिक्षण आणि घर कसे चालावायचे असा यक्ष प्रश्न या कामगारांपुढे उभा राहिला आहे.. दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांवर ही वेळ आल्याचा आरोप म्युनिसिपल ऍम्प्लॉईज युनियनने केलाय असून महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करून देखील आपला पगार होत नसल्याने या युनियनने आता मनपा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान कामगारांच्या या भुमिकेनंतर महानगरपालिका प्रशासनाने हे सर्व कामगार जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतींमधून महापालिकेत वर्ग करण्यात आले असल्याने या कामगारांना महापालिकेत समावेश करून घेण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचं म्हटलंय.सध्या महापालिकेने जिल्हापरिषदेकडे या कामगारांची माहिती मागवली असून ही माहिती आल्यानंतर महापालिकेची समिती या माहितीचा अभ्यास करून यातून तोडगा काढणार असल्याचे मनपा आयुक्त जमीर लेंगरे यांनी स्पष्ट केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here