मराठी शाळांचे डोक्यावरचे छत ढासळतंय:ज्ञानरचनेसाठी डोक्यावर छप्पर हवेच..

0

By Newstale
Correspondent Murgud
समीर कटके

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या जुन्या इमारती आता कळीच्या बनत आहेत.गेल्या तपा दिड तपापूर्वी दिमाखाने उभ्या असणाऱ्या आणि सुवर्णयुग पाहणाऱ्या या इमारती खासगी शाळांशी टक्कर देण्याच्या अगदी टिपेच्या संघर्ष काळातच लयास गेल्याचं चित्र आहे.भारतीय स्वातंत्र्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं बौद्धिक पोषण करणाऱ्या या शाळांनी महाराष्ट्र उभा केला.अनेक पिढ्यानी या शाळांत ग म भ न गिरवून महाराष्ट्राचे सामाजिक,राजकीय सांस्कृतिक जीवन उज्वल केलं. ब्रिटिशकालीन नगरपरिषद असणाऱ्या मुरगुड शहरातील जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेची विपन्नावस्था प्रातिनिधिक स्वरूपात समोर आहे.

एका बाजूस ज्ञानरचना आणि आधुनिक शिक्षण तंत्र विकसित होण्याच्या काळात जगभरातील तज्ञ विचार,आकलन,विज्ञानवादी दृष्टी, माहिती संकलन,ज्ञाननिर्मितीसाठी मातृभाषेतील शिक्षणावर भर देत असताना मराठी शाळा मात्र विपन्नावस्था भोगत आहेत. एका बाजूस शाळा,विद्यार्थी व शिक्षक आमूलाग्र बदलत आहेत तर दुसऱ्या बाजूस त्यांना संरक्षण देणाऱ्या इमारती मोडकळीस येत आहेत.अत्याधुनिक माध्यमं,नव्या तंत्रांचा वापर करत बदल स्वीकारणारी नवी पिढी मराठी शाळेत प्रोफेशनल टिचिंग लर्निंग साठी सज्ज होत आहे.त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती,नागरिक,सेवाभावी संस्था,पालक आणि स्वतः शिक्षक पदरमोड करताना दिसतात.डिजिटल शाळा,प्रज्ञा परिक्षा व दैनंदिन शैक्षणिक गुणवत्ता यामुळे या ग्रामीण भागातील शाळांनी मॉल स्कुल,इंटरनॅशनल स्कुल,वेल फर्निशड हाय फाय निवासी शाळांसह गावोगावी पसरलेल्या इंग्रजी माध्यम शाळांना कडवी टक्कर दिली आहे.त्यामुळे जाहिराती आणि तथाकथित पॅटर्न,मॉडेल्सना बळी पडलेला सुशिक्षित नवमध्यमवर्ग पुन्हा जिप शाळेतील मराठी आणि सेमी इंग्रजी वर्गात आपल्या मुलांना आणताना दिसत आहे.

एरव्ही उच्च राहणीमान असणारा मध्यमवर्ग खासगी इंग्रजी शाळांच्या पालक बैठकांना उपस्थिती लावत असे आता हीच उपस्थिती जि.प शाळातील शिक्षक पालक संघ,शालेय व्यवस्थापन समिती बैठकांना दिसते.सर्व स्तरातील मुले एकाच छताखाली शिकताहेत हे पिढ्यांच्या सामाजिकीकरणासाठी चांगले चित्र पहावयास येत आहे.पण आजकाल हे छतचं मोडकळीस येत असल्याचे नकारार्थी चित्र सुद्धा समोर येत आहे. शिक्षक,शैक्षणिक साधने सुधारली,विद्यार्थी गुणवत्ता वाढली पण त्यांना मायेचा ओलावा,सुरक्षा आणि चेहरा देणारी वास्तू मोडून पडतात असं भयावह चित्र आहे.’सर सलामत तो पगडी पचास’या न्यायाने शाळेला इमारत असेल तरच सेवा सुविधा शिक्षण आरोग्य प्रबोधन वैज्ञानिक दृष्टी आदींना अर्थ आहे. पण आता मोडकळीस आलेल्या इमारती बघून ‘सरही नही तो पचास पगडी किस कामकी” अशी अवस्था आहे.
ग्रामीण भागातील ढासळणाऱ्या धोकादायक इमारती,भग्न इमारतीत आवारात वावरणारे साप बघून कोणते शहाणे आई बाप मुलांना तिकडे पाठवतील ?
शासन,शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी या प्रश्ना बाबत फारसे गंभीर नाहीत.तीन तीन वर्षे पाठपुरावा करूनही इमारतींची डागडुजी होत नाही.निधी अभावी कामे रखडली आहेत.
मुरगूडच्या जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेची अवस्था प्रातिनिधिक आहे.
अनेक वर्षापासून या इमारतीच्या अवस्थेवर पालक,संघटनांनी आवाज उठवून सुद्धा उपयोग झाला नाही.आता भारिप बहुजन महासंघाने या प्रश्नावर आवाज उठवला आहे.12 वर्ग खोल्या असणाऱ्या शाळेतील सहा वापरात आहेत.सहा खोल्यांची पडझड झाली आहे त्यापैकी दोनच खोल्या दुरुस्तीसाठी घेतल्या आहेत.अन्य चार खोल्या पडीक राहिल्या तर त्यांची स्थिती अधिक धोकादायक होईल म्हणून तेथे मोठा हॉल बांधून मिळावा म्हणजे लहान मुलांना पावसात परिपाठ करावा लागणार नाही. गावासाठी एकच मैदान असल्याने सर्वच क्रीडा स्पर्धा याच मैदानावर होतात.त्यामुळे प्रत्येक वर्ष दोन महिने मुलांचे शैक्षणिक नुकसान होते.त्यासाठी शाळेसाठी कम्पाऊंड वॉल उभा करावे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगातून निधी मिळतो पण मुरगुड सारख्या ग्रामीण,निमशहरी स्वरूप असणाऱ्या गावाला संस्थानकालीन नगरपालिका असल्याच्या कारणावरून या निधीपासून वंचित राहावे लागते.ही अट बदलून मुरगुड साठी 14 व्या वित्त आयोगाची तरतूद करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे कागल अध्यक्ष बाळासो कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here