२०१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित – पर्यटन मंत्री जयकुमार रावल

0

आपल्या राज्याला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचा वारसा लाभलेला आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर पर्यटनासाठी करुन घेतला जात आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून पर्यटन स्थळांचा विकास करुन पर्यटकांना पुरेशा सोई सुविधा देण्याचे काम शासन युद्धपातळीवर करत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन धोरण देखील जाहीर करण्यात आले आहे. तसेच २०१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्रम्हणून देखील घोषीत करण्यात आले आहे. याबद्दल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची सविस्तर मुलाखत..

महाराष्ट्रात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इतेहाद आणि जेट एअरवेज या विमान कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे, त्याबाबत काय सांगाल?

उत्तर – हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये इतेहाद आणि जेट एअरवेज या आद्यप्रवर्तक कंपन्या आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कंपन्यांनी करार केला आहे. ही भागीदारी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा शानदार प्रचार करण्यासाठी विमानामधील नियतकालिके, संकेतस्थळे, जाहिरात आणि डिजिटल कॅम्पेनच्या माध्यमातून मार्केटिंग करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही हवाई वाहतूक कंपन्या आपल्या पर्यटकांना महाराष्ट्रातील अपरिचित, पण पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सुयोग्य अशा ठिकाणांबाबत माहिती देऊन त्यांचे महाराष्ट्रातील पर्यटन संस्मरणीय करणार आहे. या भागीदारीमध्ये महाराष्ट्रातील वैविध्य आणि त्यासाठी तळमळीने काम करणारे यजमान यांची सांगड घालण्यात येणार आहे. हे यजमान पाहुण्यांसाठी एक आनंदमयी प्रवासाचा अनुभव देऊ करणार आहेत.

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन खात्याने ओलाया कंपनीच्या सहकार्याने मुंबई दर्शन कॅब्स सुरू केल्या आहेत. त्याबाबत माहिती द्या.

उत्तर – या सामंजस्य कराराअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन यांनी ‘ओला’ कंपनी बरोबर करार केला आहे. परस्परांना सहकार्य करणारी यंत्रणा तयार करणार आहेत. ही यंत्रणा परस्परांच्या संबंधित कौशल्यावर आधारित असून यात मुंबई दर्शनच्या पर्यटक आणि ‘ओला’चे भाडे यांची सांगड घालण्यात येईल. या पॅकेजमध्ये १० तासांचा किंवा १०० किमीचा प्रवास घडविण्यात येतो. यात ‘ओला अॅप’ मधील चार विभागांत नमूद केलेल्या अटी लागू असतील. त्यात मिनी, प्राईम प्ले, प्राईम सेडान आणि प्राईम एसयूव्ही यांचा समावेश आहे. मुंबई दर्शन पॅकेजमध्ये मुंबईतील १० ‘मस्ट सी’ पर्यटन स्थळे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, जुहू समुद्रकिनारा इत्यादी स्थळांचा समावेश आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार ही ठिकाणे बदलली जाऊ शकतात.

या वर्षाच्या अखेरीस पर्यटन मंत्रालयातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव कसा असेल?

उत्तर – महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबईत एक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून या महानगराच्या आणि राज्याच्या विविध पैलूंचा प्रचार करण्यात येईल. २१ डिसेंबर २०१७ ते ६ जानेवारी २०१८ या कालावधीत मुंबई महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुबई महोत्सवाच्या धर्तीवर या महोत्सवाची संकल्पना तयार करण्यात आली आहे. या महोत्सवात खासगी टॅक्सी सेवा, बस सेवा, विमानसेवा, हॉटेल क्षेत्र आणि शॉपिंग मॉल इत्यादींना सहभागी करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईतील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्याचा हा एकात्मिक प्रयत्न आहे. या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगारसंधी ही उपलब्ध होतील.

पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी रेस्टॉरंट्स, हॉटेल संघटना, टॅक्सी संघटना, शॉपिंग सेंटर्स आणि पर्यटन कंपन्यांना सहभागी करून घेण्यासाठी शासनाची काही योजना आहे का?

उत्तर – कायमस्वरूपी सहकारी घटकांशी (स्टेक होल्डर्सशी) कायम सहकार्याच्या दृष्टीने अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. पर्यटन खात्यातर्फे जागतिक परिषदा, महत्त्वाचे कार्यक्रम आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ नाशिक यांच्यासोबत करार केल्याने नाशिकमधील पर्यटनाला चालना मिळेल, असा माझा विश्वास आहे आणि या शहरावर लक्ष केंद्रीत करण्याचा एक भाग म्हणून एमटीडीसी संयुक्तपणे तीन दिवसीय ट्रॅव्हल मार्ट आयोजित करेल. ट्रॅव्हल एजंट्सना अध्यात्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे, डोंगररांगा आणि किल्ले, पक्षी अभयारण्ये, वायनरीज आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या लेण्यांचा उपयोग पर्यटन स्थळांचा प्रसार करण्यासाठी कशा प्रकारे केला जावा, याबाबत माहिती आणि प्रशिक्षण देणे हा शासनाचा अजेंडा आहे. टुरिस्ट गाईडनी अद्ययावत राहणे गरजेचे आहे, कारण तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणेमुळे पर्यटकांना कोणत्याही ठिकाणाची माहिती ताबडतोब मिळू शकते. गाईड्स हे पर्यटनाचे मन आणि पंचेद्रिये असतात. ते राज्यातील पर्यटनाचे प्रतिनिधी असतात. पर्यटकांना या ट्रॅव्हल एजंटकडून पर्यटन ठिकाणाबाबतची विविध प्रकारची माहिती मिळत असते.

व्हिजिट महाराष्ट्र २०१७ हे केवळ ब्रीदवाक्य न राहता ते प्रत्यक्षात येण्यासाठी कोणत्या योजना आखल्या आहेत?

उत्तर – महाराष्ट्र पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राने मार्केटिंग मोहीम सुरू केली आणि त्याबाबत पुढाकार घेऊन राज्यभरात अभियान सुरू केले आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी अत्यंत बारकाव्यांसह योजना तयार करण्यात आलेली आहे. यात रोड शो, माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, परिचय सहली आणि संकल्पनेवर आधारित उत्पादने तयार करून राज्याची ब्रॅण्ड इक्विटी विकसित करणे या माध्यमांचा समावेश आहे. व्हिजीट महाराष्ट्र २०१७ या कॅम्पेनशी संलग्न असलेले प्रकल्प ग्राहक व व्यावसायिक व्यासपीठांसाठी तयार करण्याची शासनाची योजना आहे. विविध पर्यटन स्थळे आणि करमणुकीच्या अॅक्टिव्हिटींचा प्रचार करण्याची शासनाची योजना आहे.

महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे, जिथे ५ युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. कृपया त्याबाबत माहिती द्या.

उत्तर – पाच जागतिक वारसा ठिकाणे असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या ठिकाणी बहुतांश पर्यटक भेट देतात आणि या स्थळांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतो. अजिंठा-वेरूळ लेण्या, घारापुरी (एलिफंटा) लेण्या, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कास पठार आणि पश्चिम घाट ही ती ठिकाणे आहेत. उदाहरणादाखल आपण आजिंठा आणि वेरूळच्या लेण्या घेऊ या. बुद्धकाळ जेव्हा समृद्धीच्या परमोच्च बिंदूवर होता, त्या काळाची साक्ष या लेण्या देतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे ८०० लेण्या आहेत. पण यापैकी अजिंठा येथील ३२ लेण्या उठून दिसतात, त्याला कारण आहे त्यांची वैभवशाली वास्तुरचना, वारसा आणि उत्कृष्ट कलेचा नमुना. बुद्ध धर्माशी निगडित कलाकृती या लेण्यांमध्ये आहेत. त्यात चित्रे आणि शिल्पाकृती आहेत. या माध्यमातून बुद्धाची विविध अवस्थेतील रूपे आणि जातक कथा मांडण्यात आल्या आहेत. वेरूळच्या लेण्यांचेही असेच ऐतिहासिक महत्त्व आहे. या लेण्या राष्ट्रकुट साम्राज्यातील म्हणजे सुमारे १५०० वर्षांपूर्वीच्या आहेत.

तुम्हाला रंगांचे वैविध्य आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायचे असेल तर कास पठाराकडे कूच करा. या ठिकाणाला युनेस्को जागतिक वारसा ठिकाणाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक साखळी निर्माण झालेली आहे. ज्यामुळे या पठारावर पावसाळ्यात फुलांचा गालिचा दिसून येतो. मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे घारापुरी (एलिफंटा) बेट. या बेटावर पाम, आंबा आणि चिंचेच्या वृक्षांच्या रुपाने समृद्ध निसर्गसौंदर्य आहे आणि एका खडकातून कोरलेल्या लेण्यासुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातील एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. आज या ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्य कार्यालय आहे. राणी आणि सम्राज्ञी व्हिक्टोरियाच्या सन्मानाप्रीत्यर्थ पूर्वी या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होते. या स्थानकाचे बांधकाम १८७८ साली सुरू झाले आणि ते पूर्ण होण्यास सुमारे १० वर्षे लागली. राणीच्या ५० व्या वाढदिवशी १८८७ साली या स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य हे येथील ऐतिहासिक किल्ल्यांमुळे ओळखले जाते. ऐतिहासिक पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी शासनाच्या काय योजना आहेत आणि भविष्यातील प्रकल्प कोणते आहेत?

उत्तर – महाराष्ट्रातील किल्ल्यांना अनेक साहसप्रेमी, गिर्यारोहक व रॅपलिंगची आवड असणारे, तसेच पर्यटक आणि जनता महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी भेट देतात. राजस्थानातील किल्ले हे मुख्यत: वस्तुसंग्रहालय किंवा वास्तव्यासाठी वापरण्यात येतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अनेक खासगी संस्थांशी करार करण्याचा विचार करत आहे. या माध्यमातून या ऐतिहासिक ठिकाणी आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या प्रक्रिया आणि कार्यपद्धत सुरळीत होण्यासाठी आम्ही पर्यटन संचालनालयाची स्थापना केली आहे. हे संचालनालय पर्यटनाशी संबंधित विकासयोजना आणि पायाभूत सुविधा निर्माण करेल. हे संचालनालय महाराष्ट्र पर्यटन खात्याचा वित्तीय, पायाभूत सुविधांसी संबंधित आणि प्रसार व प्रचार विभाग असेल. या माध्यमातून महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी अधिक चांगल्या सुविधा आणि त्यांना चांगला अनुभव मिळावा यासाठी मदत मिळेल.

सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद यांना पर्यटन केंद्रे म्हणून घोषित करण्यात आले होते, या दोन जिल्ह्यांमधील पर्यटन विकासामुळे भविष्यात कोणत्या संधी आहेत?

उत्तर – महाराष्ट्रातील डोंगररांगांच्या कुशीत विसावलेल्या औरंगाबादमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि मानवनिर्मित आश्चर्यांची अजिबात कमतरता नाही. त्याचप्रमाणे एक शहर म्हणून औरंगाबाद आपल्या सांस्कृतिक विविधतेने आणि राहणीमानामुळे आकर्षित करून घेते आणि येथे पर्यटकांचा सर्वांगीण पाहुणचार करण्यात येतो. प्रसिद्ध असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांना युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. हवाई मार्ग, रेल्वे, रस्ते आणि उत्तम रस्त्यांच्या जाळ्याने औरंगाबाद शहर मुंबईशी आणि राज्यातील इतर भागांशी जोडले गेले आहे. अजिंठा व वेरूळप्रमाणेच पितळखोरा, दौलताबाद खुल्ताबाद, पैठण आणि शिर्डीला जाण्यासाठीही औरंगाबादमध्ये वास्तव्य करणे सोयीचे पडते. खाद्यमहोत्सव, हस्तकला महोत्सव आयोजित करण्यासाठी आणि गोल्फ पर्यटनासाठीही औरंगाबादमध्ये विपुल संधी उपलब्ध आहे. औरंगाबाद हे महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून प्रस्थापित झाले आहे. औरंगाबादच्या आजुबाजूला असलेल्या विविध पर्यटन आकर्षणांना भेट देण्यासाठी औरंगाबादमध्ये विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतात.
मालवण तालुक्यामध्ये असलेला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एक अप्रतिम जलदुर्ग आहे. याचे बांधकाम १६६४ साली सुरू झाले आणि १६६७ साली पूर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. हा गोव्याच्या खूप जवळ आहे. वास्तुरचनेची अनेक आश्चर्ये, किल्ले आणि निळाशार समुद्र असलेले किनारे व डोंगररांगा लाभलेला हा जिल्हा पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. अत्यंत भक्कम दळणवळण व्यवस्था असलेल्या या पर्यटन स्थळामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांमध्ये कोकण पर्यटनाला नव्याने चालना मिळालेली आहे. कोकणात नैसर्गिक सौंदर्य, रुपेरी व पांढरी वाळू आणि निळेशार पाणी लाभलेले २० हून अधिक समुद्रकिनारे आहेत. त्यात तारकर्ली, भोगवे, वेंगुर्ला, कोळंब इत्यादींचा समावेश आहे.
नवी पर्यटन स्थळे विकसित करण्याची राज्याची योजना आहे का?

उत्तर – जागतिक पर्यटन दिनी आम्ही महाराष्ट्रात बोधलकसा आणि कुणकेश्वर ही दोन पर्यटन स्थळे घोषित केली. यावर्षी पायाभूत सुविधानिर्मितीचे अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत आणि अनेक प्रकल्पांची लवकरच सुरुवात होणार आहे. पर्यटन स्थळांप्रमाणेच आम्ही सार्वजनिक ठिकाणी पर्यटन सेवा पुरविणाऱ्या केंद्रावर आणि नव्या पॅकेजेसवर भर देत आहोत.

महाराष्ट्रात जंगले, तीर्थक्षेत्रे आणि साहस पर्यटनस्थळे अशी अनेक प्रकारची ठिकाणे आहेत. त्यांना विकसित करण्यासाठी शासन कोणती पावले उचलली आहेत?

उत्तर – पावसाळ्यात महाराष्ट्रातील जंगलाच्या सौंदर्यात भर पडते आणि पावसाळ्यात वन्यजीवनाचा अनुभव घेता यावा अशी अनेकांची मागणी आहे. एमटीडीसीतर्फे त्यांना या वर्षी पावसाळ्यात ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पांमध्ये निसर्गभ्रमण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छायाचित्रकारांसाठी ही एक सुवर्णसंधीच असणार आहे. या धुंद वातावरणात अत्यंत मनमोहक आणि उत्तम वन्यचित्रे मिळतील याची खात्री आहे. या पावसाळ्यात मोहार्ली-खाटोडा-ताडोबा-पांढरपौणी-नवेगाव, कोलार-जामणी, चौक-वाघाई-पांढरपौणी, जामणी चौक-ताडोबा आणि जामुन बोडी मार्गे खुटवंडा-खाटोडा-ताडोबा, हे व्याघ्रप्रकल्प जंगल सफारीसाठी खुले राहणार आहेत.

महाराष्ट्र अजूनही विकसित होत आहे आणि अपरिचित आहे. त्या ठिकाणी पर्यटनाला कशा प्रकारे चालना देण्यात येणार आहे?

उत्तर- महाराष्ट्रात झालेला विकास आणि येथील उपक्रम यांचा प्रसार करण्यासाठी आम्ही नियमितपणे परिचय सहलींचे आयोजन करतो. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन भारतभर आणि परदेशातही रोड शों चे आयोजन करीत असते. ह्या रोड शो आणि परिचय सहलींमुळे विविक्ष क्षेत्रातील तज्ज्ञ आणि व्यावसायिक यांना सहभागी करून घेता येते. या उपक्रमांमध्ये सहभागी होणे खूपच फायदेशीर ठरते कारण त्यातून आपली संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे यांची ओळख करून घेता येते आणि महाराष्ट्रातील विविध संधींचा लाभ घेण्यासाठी मदत होते.

अजिंठा-वेरूळ परिसरात जपानी गाव वसविण्याच्या योजनेबद्दल काही सांगू शकाल का?

उत्तर – अजिंठा आणि वेरूळ लेण्यांजवळ जपानी गाव वसविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, जेणेकरून अधिकाधिक जपानी पर्यटकांना आकर्षित करता येईल. उगवत्या सूर्याच्या देशातील पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी वाकायामा प्रिफेक्चरल गव्हर्नमेंट (डब्ल्यूपीजी) यांच्या सहकार्याने जागतिक वारसा असलेल्या या भित्तीचित्रांचे संवर्धन करण्यात येत आहे. प्रस्तावित जपानी गावात जपानी पद्धतीचा पाहुणचार दिला जाईल आणि तेथे जपानी संस्कृतीचा अवलंब केला जाईल, जेणेकरून जपानी पर्यटक आणि अभ्यागतांना आपल्या घरच्या वातावरणात आल्यासारखे वाटेल. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने डब्ल्यूपीजीशी सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) अजिंठा-वेरूळच्या विकासाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्याचप्रमाणे या सामंजस्य करारात दोन्हीकडील सरकारांनी तयार केलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून परस्परांच्या आर्थिक विकासात वृद्धी करणे, शेतीला व स्थानिक उद्योगांमधील अन्न पक्रिया यांना चालना देणे यासाठी महाराष्ट्र आणि डब्ल्यूपीजी यांच्यातर्फे करण्यात येणारे प्रयत्न अधोरेखित करण्यात आले आहेत.

वन्यपर्यटनासाठी तुम्ही काही ठोस योजना तयार केल्या आहेत का?

उत्तर – निसर्गामुळे, एखाद्या भागातील वनस्पती व प्राणीजीवन यांचे नियमन होत असते या दृष्टीने महाराष्ट्रावर निसर्गाची मोठी कृपादृष्टीच राहिली आहे, कारण महाराष्ट्रात वन्य प्राण्यांसाठी असलेली मोठी अभयारण्ये पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. ही ठिकाणे संशोधक व पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात वसलेले नागझिरा अभयारण्य म्हणजे भारतातील काही मूळच्या निबीड अभयारण्यांपैकी एक समजले जाते. या ठिकाणी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या वाघांसह इतर अनेक वन्य प्राण्यांना उत्तम नैसर्गिक अधिवास लाभला असून त्यामुळे वन्य प्राण्यांची लोकसंख्या वाढण्यास मदत झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा वन्यपर्यटनाला चालना देण्यासाठीचा देशातील एक सर्वोत्तम व्याघ्रप्रकल्प आहे. या ठिकाणी वाघ, चित्ता, स्लॉथ बेअर, गवा आणि स्थानिक व स्थलांतरित पक्षांच्या वैविध्यपूर्ण प्रजाती पाहायला मिळतात. आमच्यातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये आम्ही नियमितपणे सुधारणा करत आहोत आणि महाराष्ट्राला हे प्रथम क्रमांकाचे पर्यटन स्थळ म्हणून स्थान मिळवून देण्यात शासन आतापर्यंत यशस्वी झाले आहे.

तीर्थक्षेत्र पर्यटनाला स्वत:चे वेगळे महत्त्व आहे. अष्टविनायकदर्शन हे त्यापैकीच एक? त्यासाठी शासन कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देणार आहे?

उत्तर – महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी आहे. मग तो भीमाशंकरचा धबधबा असो वा त्र्यंबकेश्वरचे गरम पाण्याचे झरे असो तेथे देवांचा वास कायम आहे. देशात अध्यात्माला महत्त्व असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक सामान्य ठिकाणे भव्य-दिव्य धार्मिक स्थळांचा वारसा जपणारी स्थळे झाली आहेत. या ठिकाणी चांगल्या पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यावर शासनाचा भर आहे जेणेकडून येथे भेट देणाऱ्यांना एक समाधानकारक व अविश्वसनीय अनुभव घेता येईल आणि ज्यामुळे भविष्यातील वाढत्या पर्यटकांचे आदरातीथ्य करता येईल.

महाराष्ट्र पर्यटनाची तुलना आंतरराष्ट्रीय पर्यटनाशी करता येईल का?

उत्तर – स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या परिसरात होणाऱ्या विकासयोजनांमुळे महाराष्ट्रातील पर्यटन सोयीसुविधांची आंतरराष्ट्रीय पर्यटन सुविधांशी निश्चितच तुलना करता येऊ शकते. मुंबईमध्ये टी२ टर्मिनल आणि मुंबई मेट्रो व मोनो रेल सुरू करून दळणवळण व्यवस्था अधिक भक्कम करण्यात आली आहे. राज्याला वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य लाभले आहे. डोंगररांगा, सुळके, धबधबे, जंगले, समुद्रकिनारे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या भव्य किल्ल्यांचा यात समावेश आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा विचार करता महाराष्ट्र हे सर्वात लोकप्रिय आणि प्राधान्य देण्यात येणारे पर्यटन ठिकाण होऊ लागले आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी राहिली असून २०१४ सालातील आकडेवारीनुसार परदेशी पर्यटक आगमनात (फॉरेन टुरिस्ट अरायव्हल्स – एफटीए) महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक आहे आणि स्थानिक पर्यटक आगमनात (डोमेस्टिक टुरिस्ट अरायव्हल्स) महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. आधीच्या वर्षीच्या तुलनेत डीटीएमध्ये १०.२% तर एफटीएमध्ये ११.९% वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

प्रत्येक ठिकाणाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असते. ही वैशिष्ट्ये पर्यटकांपर्यंत कशापद्धतीने पोहोचविली जातात?

उत्तर – महाराष्ट्र हे एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण असून अरबी समुद्र आणि पश्चिम घाटांमध्ये वसलेले आहे. त्यामुळे येथे समृद्ध वृक्षसंपदा आणि वन्यसंपदा आहे. राज्याला वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य लाभले आहे. डोंगररांगा, सुळके, धबधबे, जंगले, समुद्रकिनारे आणि महाराष्ट्राच्या गौरवपूर्ण इतिहासाची साक्ष देणाऱ्या भव्य किल्ल्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ठिकाणे आणि त्यांची वैशिष्ट्ये याबाबत पर्यटकांना माहिती देत असतो. आंबोली, ज्याला महाराष्ट्राची राणी म्हटले जाते आणि त्याचे नैसर्गिक वैभव, त्याचप्रमाणे कास पठाराची लाखो फुलांचे पठार अशी ओळख करून देण्यात येते. अशा प्रकारे विविध पर्यटन स्थळांची पर्यटकांना प्रभावी माध्यमातून माहिती देण्यात येते.

पर्यटनाला चालना देण्यासाठी खासगी पर्यटन कंपन्यांशी हातमिळवणी करण्याचा विचार आहे का?

उत्तर – पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही या पर्यायाचा विचार केला आहे. डेक्कन ओडिसी या महाराष्ट्र पर्यटनाच्या राजेशाही ट्रेन सेवेच्या संचलनासाठी आम्ही यापूर्वी कॉक्स अँड किंग्जचे सहकार्य घेतले होते. कॉक्स अँड किंग्जने या ट्रेनच्या संचलनाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे आणि विक्री, मार्केटिंग, ऑपरेशन्स, ट्रेनमधील आणि पर्यटकांना, विशेषत: परदेशी पर्यटकांना पर्यटन स्थळी पोहोचल्यावर सेवा पुरविण्यात येतात.

रोहयोमधून लोकांना रोजगार मिळण्याबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी काय तरतूद केली आहे?

उत्तर – या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण कामगारांना रोजगाराची हमी मिळते. त्याचप्रमाणे ज्या भागांमध्ये जे वंचित घटक आहेत तिथे ही रोजगार हमी योजना सुरू करून तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा करता येऊ शकते. त्याचप्रमाणे सामाजिक दृष्ट्या मागासलेले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांनासुद्धा या सरकारी उपक्रमाचा चांगल्या उपजिवीकेसाठी लाभ घेता यावा हे सरकारचे लक्ष्य आहे.

रोहयो तसेच पर्यटनाबाबत आपण काय संदेश द्याल?

उत्तर – अकुशल कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांना विविध क्षेत्रांमध्ये सामावून घेण्यासाठी पर्यटन खात्याने रोजगार हमी योजना सुरू केली आहे, जेणेकरून राज्य पातळीवर पर्यटनाला चालना मिळेल. या योजनेच्या माध्यमातून कौशल्यामध्ये सुधारणा होईल आणि त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा वाढेल. यातूनच ते या क्षेत्रातील आव्हानांना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सज्ज होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here