कोल्हापूरात शुक्रवारपासून गृहिणी महोत्सव प्रारंभ

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ८ ते ११ मार्चअखेर गृहिणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिमा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूरमधील संभाजीनगर येथील निर्माण चौक येथे होणाऱ्या महोत्सवात महिला बचत गटांनी बनविलेल्या पदार्थांची विक्री, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महिला दिनी शुक्रवारी (ता. ८) सकाळी सात वाजता गांधी मैदान ते बिंदू चौक मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन होणार आहे. संगीता निंबाळकर यांचे ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार असून, मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित केले आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या वीर जवानांना देशभक्तीपर गीते व नृत्याविष्कारातून अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी दुपारी पुष्परचना व रांगोळी स्पर्धा होणार आहे.

शनिवारी (ता.९) दुपारी दोन वाजता पाककृती तसेच नववधू मेकअप (ब्रायडल) स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी सात वाजता सोनी मराठी प्रस्तुत ‘जल्लोष लोकसंगीताचा’ हा कार्यक्रम होईल. यामध्ये गायक आनंद शिंदे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, श्रुती मराठे सहभागी होणार आहेत. रविवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाच वाजता स्पॉट गेम्स व होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता लाइव्ह म्युझिक शो होणार आहे. या दिवशी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणा­ऱ्या सहा महिलांचा ‘गृहिणी गौरव’ सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. मिस वर्ल्ड युक्ता मुखी यांच्या हस्ते आणि फेमिना मिसेस इंडिया नूतन वायचळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here