महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्स करण्याचे शासनाचे लक्ष्य- राज्यपाल

पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

0

मुंबई : महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी २०२५ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक हजार अब्ज डॉलर्स इतकी करण्याचे शासनाचे लक्ष्य असून त्यासाठी कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, नवउद्यम यासारख्या अनेक क्षेत्रातील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल पुढे म्हणाले, अर्थव्यवस्थेचे हे एक हजार अब्ज डॉलरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संरक्षण, कृषी व अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, अंतराळ, लॉजिस्टिक्स, वित्त तंत्रज्ञान, ॲनिमेशन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता यासारख्या उद्योगांशी संबंधित धोरणे शासनाने स्वीकारली आहेत. एक हजार अब्ज डॉलरपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध धोरणांची आणि कार्यक्रमांची माहिती ही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात दिली. ते म्हणाले, विविध क्षेत्रात केलेल्या भरीव गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राचे स्थूल राज्य उत्पन्न ५.४ टक्क्यांहून ९.४ टक्के इतके वाढले आहे. महाराष्ट्राच्या उणे कृषी विकासाचा दर अधिक १२.५ टक्के इतका झाला आहे. २०१३-१४ मधील २९ हजार कोटी रुपयांची कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढून ती २०१७-१८ मध्ये ८३ हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. मागेल त्याला शेततळे, पंपसंचाचे विद्युतीकरण, जलयुक्त शिवार यासारख्या माध्यमातून कृषी आणि संलग्न क्षेत्रातील मत्ता वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजना आणि किमान आधारभूत किंमत योजनेतून शेतीमाल खरेदी करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here