शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील – अर्जुन खोतकर

0

पशुसंवर्धन विभाग हा शेती क्षेत्राशी निगडीत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांसाठी थेट मदतीचे धोरण स्वीकारले आहे. शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी मराठवाडा पॅकेज राबविण्यात येत आहे. या पॅकेज अंतर्गत गरजू शेतकऱ्यांना दोन गाई व म्हशी, वीस शेळ्या, दोन बोकड देण्यात येतात. या पॅकेजच्या माध्यतातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग मंत्री अर्जुन खोतकर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात कुक्कुट पालन योजना राबविण्यात येत आहे.

कुक्कुट पालन ही योजना विदर्भ आणि मराठवाडा या विभागात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासन यांचे 50 टक्के तसेच मागासवर्गीयांसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे.

कुक्कुट पालनातून अंडी व्यवसाय आणि त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहे.

अंडी व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यात लोकांना रोजगार मिळावा यासाठी कुक्कुट पालन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील अंगणवाडी किंवा गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबडीचे पिल्लू देऊन त्यांच्याकडून अंडी घेऊन ह्या व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. यासाठी 22 ते 25 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे.

गोवर्धन गोवंश सेवाकेंद्र योजना काय आहे. गोशाळांना कशाप्रकारे अनुदान देण्यात येते.

केंद्र आणि राज्य शासनाने भाकड जनावरांच्या सुरक्षेसाठी नव्याने कायदा तयार केला आहे. भाकड जनावरांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना आसरा मिळण्यासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना राज्य शासनाने सुरु केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी शासनाने दूध दरवाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळेल.

कामधेनु दत्तक ग्राम योजना काय आहे. चारायुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात काय फरक पडतो आहे.

लोकांना दुग्ध व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी कामधेनु ग्राम दत्तक योजना शासनाने सुरु केली. या योजनेत शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा मिळण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना चाऱ्यावर अनुदान देण्यात येते. तसेच ही योजना दुधाळ जनावरांशी निगडीत असल्याने एन.डी.डी.बी संस्थेमार्फत दुधाला योग्य दर देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळणार आहे.

राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे का ?

राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी शासनाने निलक्रांती योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय वाढीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत मत्स्यबीज वाढ होण्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहे. या योजनेमुळे कोळंबी, खेकडे, शिंपले यांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या व्यवसायाची व्याप्ती वाढल्याने बंदरांचाही विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही बंदर विकास होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

रोजगार निर्मितीसाठी राज्यातील बंद पडलेल्या कंपन्याचे पुनर्वसन किंवा स्थलांतर करून त्या चालू करण्यात येणार आहे का.

राज्यातील काही भागात सूत गिरण्या बंद पडल्या आहेत. या बंद पडलेल्या कंपन्याच्या जागी वसाहती निर्माण होत आहेत. म्हणूनच या बंद पडलेल्या कंपन्यांना शासनाच्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून अमरावती, नांदगाव येथे कंपन्या स्थलांतरीत करण्याचे आवाहन करण्यात आले. रेमंडपासून सर्व दर्जेदार कंपन्या तेथे येऊ लागल्या आहेत. टेक्स्टाईलचं मोठं हब या भागात होण्याच्या दृष्टीने राज्य शासन कार्यरत आहे.

राज्याच्या आर्थिक संरचनेत वस्त्रोद्योग खूप मोठी भूमिका निभावत आहे. त्याबद्दल काय सांगाल?

वस्त्रोद्योगात भारत हा नंबर दोनची भूमिका निभावणार आहे. राज्यात रेशीमला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. शेकतरी किडे पाळून रेशमकोष निर्माण करतो. कोषचे पीक वर्षातून ६ ते ७ वेळेस घेता येते. एका एकरमध्ये अडीच लाखापेक्षा जास्त रेशीमचे उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत. रेशीम शेतीला प्रचंड वाव असल्याने शेतकऱ्यांनी रेशीमची शेती करावी. आपल्या देशात येवला, पैठण, जेथे सिल्कच्या साड्या तयार होतात तेथे रेशीम चीनकडून आयात करावे लागते. आपल्या देशातच जर रेशीम तयार झाले तर त्याचा खूप फायदा होईल. आपल्याकडे रेशीम उद्योगाला हक्काची बाजार पेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली आहे. एकूण सहा कोटी रुपये खर्च करून जालना जिल्ह्यात पहिली रेशीमची बाजारपेठ तयार केली जात आहे. त्यामुळे रेशीम शेतीतून शेतकऱ्याची उन्नती होऊ शकेल.

तलाव तेथे मासळीहा उपक्रम काय आहे?

पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर एक छोटं तळ आहे. शेतकरी त्यात माश्यांचे बीज सोडतो आणि वर्षभर मासे खातो. त्या एका तळ्यातून संपूर्ण कुटुंबाला मासे मिळतात. याचा विचार करून शेत तळ्यांमध्ये राज्य शासनाने कडवंची गावात काही प्रमाणात माश्यांचे बीज पुरविले. भविष्यात ज्या ठिकाणी पाझर तलाव आहे. ज्या ठिकाणी बारामाही, आठमाही पाणी साचू शकते अशा तलावांमध्ये मासे, बीज देण्यात येणार आहे. या माध्यमातून लोकांना मासे सहज उपलब्ध होऊ शकतील.

पदुम विभागात राबविण्यात आलेल्या योजनांना शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो?

दुध दराला एका वर्षात तीन वेळेस भाव वाढून दिल्यामुळे दूध व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रेशीम शेतीबाबत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. मासे व्यवसायात पहिल्यापेक्षा दुप्पटीने वाढ होऊन प्रगती झाली. सर्व क्षेत्रात टप्प्याटप्प्याने आमुलाग्र बदल होत आहे आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

दुग्ध विकास म्हटलं की डोळ्यापुढे पश्चिम महाराष्ट्र येतो मराठवाडा हा लोकांच्या डोळ्यापुढे येऊ शकेल का? आणि तो कधी येईल?

राज्यात ८० टक्के पेक्षाही अधिक दूध हे पश्चिम महाराष्ट्रातून येते. पुणे, कोल्हापुर, अहमदनगर, सातारा, सांगली, या जिल्ह्यातल्या दुधापासून संपूर्ण राज्याला पुरवठा केला जातो. मराठवाडा पॅकेज योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना पन्नास टक्के अनुदान या कामासाठी देऊ पाहत आहे. मराठवाडा काही दिवसात स्वयंपूर्ण होऊन इतर भागात दूध निर्यात करू शकेल.

शेतकऱ्यांची नवीन पिढी ही शिक्षित आहे. त्यांच्यापर्यंत या विभागाच्या योजना पोहचविण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत.

आताची शिकलेली, नोकरीला जाणारी मुले सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करू लागलेली आहे. नाशिक सोडून द्राक्ष उत्पादन कोठे होत नव्हते मात्र जालन्यामध्येसुद्धा आता खूप चांगल्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा येऊ लागल्या आहेत. कुक्‍कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम शेती, दूध व्यवसाय या सर्व नवीन क्षेत्रांमध्ये नवीन पिढी फार चांगल्या प्रकारे कार्य करू पाहत आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण राज्यातील शेतकरी, नवीन पिढीला काय आवाहन कराल?

आपल्याकडे शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या क्षेत्रात वेळोवेळी क्रांती घडुन आलेली आहे. या क्षेत्राचा जर विकास करावयाचा असेल तर तरूणांनी या क्षेत्रात येणे गरजेचे आहे. नवीन शिक्षित पिढी जर या क्षेत्रात आली तर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून या क्षेत्रात एक वेगळी क्रांती घडू शकते म्हणून शेती क्षेत्राला दुय्यम न मानता तरूणांनी या क्षेत्रात येऊन एक आदर्श निर्माण केला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here