दैव देते अन् कर्म नेते… प्रा. मंडलिक यांची विचित्र अवस्था

0

 

कोल्हापूर (विकास सुतार) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. पण खरी लढत काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक व शिवसेना, भाजपा व मित्रपक्षांचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यात होत आहे. गेले पाच वर्षाच्या खा. महाडिक यांच्या कामगिरीवर अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे महाडिक यांनी मोठ्या प्रमाणावर पॅचअप सुरू केले आहे. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी “आमचं ठरलय” अशी उघड भुमिका घेत धनुष्यबाण “हाता”त घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र प्रा. मंडलिक यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांना निकालाआधिच विजयाची नशा चढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र ही निवडणूक आहे हे ते हेतुपुरस्सर विसरत आहेत. त्यामुळेच दैव देते अन् कर्म नेते….. अशी प्रा. मंडलिक यांची अवस्था झाल्याचे चित्र सरबंळवाडी (ता. आजरा) येथील मेळाव्यात दिसून आले.

शनिवारी (दि. १३) डॉ. शंकरराव उत्तुरे हायस्कूल सरबंळवाडी येथे चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते उद्योगपती रमेशराव रेडेकर यांनी आपल्या गटाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रेडेकर गट प्रा. मंडलिक यांना पाठिंबा जाहीर करणार होते. विशेष म्हणजे रमेशराव रेडेकर यांच्या पत्नी सौ. सुनिता रेडेकर या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीकडून कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्या म्हणून विजयी झाल्या आहेत. तसेच त्या महाडिकांच्या पाठिंब्यावरच आजरा साखर कारखान्यात संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे रेडेकर गट महाडिकांना पाठिंबा देतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र रेडेकर यांनी पक्षनिष्ठा दाखवत शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा ठाम निश्चय केला. प्रा. मंडलिक यांनी कार्यक्रमाची वेळ दुपारी २ वाजताची निश्चित केली होती. यासाठी रेडेकर यांनी १० हजार कार्यकर्ते उपस्थित ठेवण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. अगदी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यकर्ते दाखल होत होते. मेळाव्याला मोठी गर्दी जमली होती. १ वाजताच संपूर्ण मंडप भरून गेला. लोकसभा निवडणूकीत पाठिंबा देण्यासाठी आयोजित मेळाव्यात आगामी चंदगड विधानसभेला रेडेकर यांना मोठा प्रतिसाद मिळण्याचे संकेत मिळाले. कार्यक्रमासाठी भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर हे देखील उपस्थित होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक नेत्यांनी पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेला हा सर्वात मोठा मेळावा होता. नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमून देखील उमेदवार संजय मंडलिक हे लवकर उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मेळावा सुरू करण्यात आला. उमेदवार उपस्थित राहतील या आशेने अनेकांना मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली. सर्वांनीच या मेळाव्यात रमेशराव रेडेकर यांना विधानसभेला उमेदवारी देण्याची मागणी केली. यादरम्यान पावसाचेही वातावरण तयार झाले. सार्‍यांचे लक्ष उमेदवाराच्या आगमनाकडे तसेच पावसाकडे होते. या सार्‍यात उशीर होत असल्याने आ. हाळवणकर यांनी आपले भाषण आटपले. शेवटी भाजपा नेते रमेशराव रेडेकर यांनी आपल्या मनोगतात युती धर्म पाळत आपण महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला. रेडेकरांच्या भाषणानंतर लोकांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. ते उमेदवार प्रा. मंडलिक यांच्यासाठी थांबले नाहीत. त्यानंतर थोड्यावेळाने प्रा. मंडलिक दाखल झाले. पण त्यांच्यावर फक्त नेत्यांनाच भेटण्याची वेळ आली. कार्यकर्ते तर केव्हाच रवाना झाले होते. प्रा. मंडलिक यांच्या उशीरामुळे भाजपा आ. हाळवणकर, आयोजक भाजपा नेते रमेशराव रेडेकर, युवा नेते आदित्य रेडेकर यांच्यासह सर्वच कार्यकर्ते नाराज झाले. एवढे मोठे नियोजन व मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवूनही प्रा. मंडलिकांच्या उशिरामुळे संयोजकांचा भ्रमनिरास झाला.

प्रा. मंडलिक यांनी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेच्या अनेक निवडणूका लढविल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावर “नॉटरिचेबल”चा आरोप होतो. ते भेटत नसल्याचे सांगितले जाते. ते या मेळ्याच्या निमित्ताने खरे झाल्याची चर्चा आहे. रमेशराव रेडेकर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची तसेच आपल्यावरील आरोप खोडून काढण्याची मिळालेली संधी प्रा. मंडलिक हे गमावून बसले. त्यातच निवडणूक चुरशीची असताना देखिल आणि प्रत्येक मत महत्वाचे असताना देखिल केलेली चूक प्रा. मंडलिक यांना महागात पडू शकते. त्याचमुळे सरबंळवाडीतील मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे, दैव देते अन् कर्म नेते अशीच अवस्था प्रा. मंडलिक यांची झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here