माणुसकी जपणारे तलाठी गणेश ठोसरे

0

शासकीय कार्यालय आणि सरकारी कर्मचारी म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. काहींच्या कपाळावर आठ्या पडतात. पण हा समज खोटा ठरविणारे आणि माणूस म्हणून आपले चांगुलपण सिध्द करणारे ही अनेक जण शासकीय नोकरीत आहेत. याचा प्रत्यय दिला तो आदर्श तलाठी म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला ते चंदगड़ तालुक्यातील तलाठी गणेश ठोसरे यांनी.

24 जून ची संध्याकाळ. दुसऱ्या दिवशी ई-चावडी ट्रेनिंगसाठी कोल्हापूरला जायचे होते असा तहसीलदारांचा संदेश गणेश ठोसरे यांना मिळाला होता. जेवण करून ग्रामपंचायत निवडणूक 2017 प्रभाग रचना तयार करत ते बसले होते. रात्रीचे 11 वाजले असतील तोच त्यांच्या दरवाज्यावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण दरवाजात आले असेल असा विचार करत त्यांनी दरवाजा उघडला. समोर एक पंचवीशीतील तरुण व सोबत पन्नाशीतील त्याचे वडील सर्वस्व हरवल्यासारखे केवीलवाण्या नजरेने त्यांच्याकडे व आपसात एकमेकांकडे फक्त बघत होते. त्या दोघांनीही इतक्या रात्री त्रास दिल्याबद्दल आधी गणेश ठोसरे यांची क्षमा मागितली व त्यांना घरात येण्याची विनंती केली. एका क्षणात त्या पंचवीशीतील तरुणाने जोरात हंबरडा फोडण्यास सुरूवात केली. वडीलांचेही डोळे पाणावले. त्यांना काय झाले हे माहिती नसल्याने काही सुचेना. पाणी दिल्यानंतर त्या  बाप-लेकांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली.

तो तरुण ठोसरे यांना म्हणाला आजच दवाखान्यातून आलोय आजच निदान लागलं. इतके दवाखाने फिरलो पण निदान होत नव्हते. त्याच्या या विधानावरून त्यांना इतकेच कळाले की, त्याच्या जवळचे कुणीतरी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तो म्हणाला साहेब आम्हाला कुणाचा आधार नाही. एक वर्षापूर्वीच बाबांच ऑपरेशन करून आणले. त्यासाठी जमीन विकून खर्च भागविला आणि आता आज आईच्या आजाराच निदान झालं. जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही. ठोसरे यांनी त्याला सगळी हकीकत विचारून घेतली तर त्याच्या आईला कॅन्सर असल्याचं डॉक्टरांनी निदान केल्याचं त्यांना समजल. आईच्या उपचारासाठी त्याला जमीन विकून पैसे उभे करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याचा 7/12 चा उतारा खूप मोठा होता. त्याला तो दुरुस्त करून घेऊन सकाळी ती जमीन विकून ऑपरेशन करायला जायच होते. हे ऐकून गणेश ठोसरे यांना खूप वाईट वाटले. त्यांनी त्याला धीर दिला. त्यांना कळून चुकलं होत की, याच्या पेक्षा सेवा करण्याची मोठी संधी त्यांना कदाचित आयुष्यात मिळणार नाही. ठोसरे यांच्या पत्नीने हात खर्चासाठी दिलेले पैसे 3 वर्षांपासून त्यांनी साठवले होते ते दहा हजार रुपये त्या तरुणाला त्यांनी देऊ केले. त्या तरूणाने पैसे स्वीकारायला नकार दिला. पण त्यांनी त्याला ते ठेऊन घेण्याची विनंती केली व सांगितले की उद्या सकाळी फक्त आईला ॲडमिट कर नंतर आपण बघू. तसेच सकाळी 7 वाजता तुला 7/12 मिळेल अशी ग्वाहीही दिली.

श्री ठोसरे हे रात्री 11.30 ला 10 की मी लांब असलेल्या कामाच्या ठिकाणी गेले व पहाटे 4.00 पर्यंत उतारा दुरुस्त केला व प्रिंट काढून ठेवली व सकाळी 7 ला त्या तरुणाला दूरध्वनीवरुन 7/12 घेऊन जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी MRI करून त्याने आईला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. डॉक्टरांनी परत निदान केलं की कॅन्सर नाही लहान आतड्याला गाठ आहे. पुढं चार दिवसांनी त्या तरूणाने थोडी जमीन विकून ऑपरेशन करून घेतले. ठोसरे यांचे पैसे कृतज्ञतेने परत केले. आता त्या तरुणाची आई ठणठणीत आहे. तो जेव्हा केव्हा ठोसरे यांना भेटतो तो म्हणतो साहेब सगळे नातेवाईक अडचणीच्या वेळी पाठ फिरवून गेले पण तुम्ही 800 कि.मी वरून नोकरी निमीत्त आलात आणि माझ्याबद्दल जी काही माणुसकी दाखवली तुम्ही माझ्यासाठी देव आहात. तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो की, बाबारे तुझ्या या अडचणीने माझ्यातला चांगला माणूस जागा करून सेवेची संधी दिली तूच माझ्यासाठी देव आहेस…..ही हकीकत त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितली तेव्हा त्यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. एकूणच माणूस हा कोणत्या क्षेत्रात, कोणत्या पदावर काम करतो हे महत्त्वाचे नसते तर त्याच्यातला चांगुलपणा त्याचा दर्जा, व्यक्ती महत्त्वाची उंची ठरवत असतात हेच खरे. माणुसकी जपणाऱ्या तलाठी ठोसरे यांचा नुकताच जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले. त्यांच्यावर प्रशासनातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here