गडहिंग्लज काळभैरव यात्रेला उत्साहात प्रारंभ

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र मधिल भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गडहिंग्लजनजीकच्या काळभैरवाच्या यात्रेचा गुरूवार (दि. २१) हा मुख्य दिवस आहे. या निमित्त काळभैरव डोंगरावर भाविकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. प्रशासनाने देखील यात्रेचे मोठे नियोजन केले आहे. दरम्यान बुधवार (दि. २०) रोजी मध्यरात्री गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांचे हस्ते व तहसिलदार रामलिंग चव्हाण तसेच मानकरी व देवस्थान समिति पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काळभैरवाची विधीवत पुजा होऊ मुख्य यात्रेला प्रारंभ झाला. या वेळेपासुन भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ‘काळभैरीच्या नावानं चांगभलं..’ च्या गजरात भाविक भक्तिरसात चिंब झाले आहेत.

 

दरम्यान काळभैरवाचा पालखी सोहळा बुधवार उत्साहात पार पडला. सायंकाळी गडहिंग्लजातील काळभैरवाच्या मंदिरामध्ये मानकर्‍यांच्या उपस्थितीत पालखीची विधीवत पूजा करून सोहळ्यास प्रारंभ झाला. मंदिरापासून पालखी शिवाजी चौकातून, मुख्य बाजारपेठेतून वीरशैव बँकेपासून काळभैरी रोडकडे मार्गस्थ झाली. गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात अनेक मंडळे या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती. पालखी सोहळ्यासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या सोहळ्यात काळभैरवाच्या सासनकाठीला गोंडे बांधण्याची प्रथा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. काही मंडळांनी मोठ-मोठ्या आकाराचे गोंडे सासनकाठीला बांधले. बराचकाळ पालखी गडहिंग्लज शहरामध्ये होती. पालखी डोंगरावरील मंदिराकडे रात्री उशीरा रवाना झाली.

गडहिंग्लजच्या उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर एका उंचावलेल्या डोंगरवजा टेकडीच्या कुशीत गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द काळभैरवाचे रमणीय स्थान आहे. काळभैरवाच्या मंदिराचा अलिकडेच जीर्णोध्दार करण्यात आला आहे. काळभैरवाच्या मंदिरात शेजारी-शेजारी दोन मूर्ती उभ्या असून त्यातील एक काळभैरवाची व दुसरी जोगाईची आहे. काळभैरवाने नागवंशीयांचा पराभव करून नागकन्या जोगाईला धरुन आणली व तेंव्हापासून ती काळभैरवाजवळच आहे, अशी भाविकांची श्रध्दा आहे. गडहिंग्लज भागात लिंगायत धर्मियांची संख्या बरीच असून काळभैरवाला शाकाहारी नैवेद्य द्यावा लागतो तर जोगाईला मांसाहारी नैवेद्य चालतो. काळभैरवाची यात्रा प्रसिध्द असून ती दरवर्षी साजरी होते. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक यात्रेच्यावेळी गर्दी करतात.

गुरूवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली श्‍वानपथक, बॉम्बशोधक पथक यासह अन्य तुकड्यांचे जवान असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here