गडहिंग्लजची हद्दवाढ कृती समितीच्या पाठपुराव्यामुळेच-आमदार हसन मुश्रीफ

1

गडहिंग्लज – प्रतिनिधी

गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीला राज्य सरकारकडून मिळालेली मंजुरी म्हणजे कृती समितीच्या पाठपुराव्याचे यश आहे, असे गौरवोद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कृती समितीने आयोजित केलेला सत्कार आमदार श्री . हसन मुश्रीफ यांनी अत्यंत विनयाने व नम्रपणे नाकारला . उलट; यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल कृती समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन श्री . मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

भाषणात बोलताना आमदार श्री मुश्रीफ म्हणाले, २००८ साली मी नगरविकास राज्यमंत्री असताना सव्वाशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीला मंजुरी दिली होती. त्यावेळी काही तांत्रिक कारणास्तव ही हद्दवाढ बारगळली होती. गेली साडेचार वर्षे कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न व पाठपुरावा केल्यानंतर या हद्दवाढीला पुन्हा दुसऱ्यांदा मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी येत्या महिनाभरात या विषयावर हरकती व सूचना मागवून घेतील. त्यावर सुनावणी होऊन तसा अहवाल नगरविकास खात्याकडे जाईल. त्यामुळे अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने हे काम पूर्ण होईल. मग त्या वेळीच सत्कार स्वीकारू. दहा वर्षांपूर्वी गडिंगलज शहरासह कडगाव -कौलगे जिल्हा परिषद मतदार संघ कागल विधानसभा मतदारसंघात नव्याने समाविष्ट झाल्यानंतर या परिसराला विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही , असेही ते म्हणाले.

सरंजामशाही मनोवृत्ती…
दोन दिवसांपूर्वीच समरजीत घाटगे यांनी भाषणात, या हद्दवाढीला विरोध करेल त्याची माझ्याशी गाठ आहे, असे आव्हानात्मक विधान केले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, लोकशाहीमध्ये माझ्याशी गाठ आहे, अशी खुनशी व आव्हानात्मक भाषा करणे योग्य नाही. यामध्ये त्यांचा काही दोष नाही, हा तर त्यांच्या सरंजामशाही मनोवृत्तीचाच दोष आहे. जे कुणी हद्दवाढीला विरोध करतील त्यांना आपण हात जोडून समजावून सांगूया. शहराच्या आणि नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने हद्दवाढ किती गरजेचे आहे ते पटवून देवूया, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

उतावळा नवरा…
दोनच दिवसापूर्वी गडहिंग्लजच्या हद्दवाढीबद्दल समरजीत घाटगे यांचा शहरात भाजपच्या वतीने सत्कार झाला. हाच धागा पकडून त्यांच्या नावाचा उल्लेख न करता मुश्रीफ म्हणाले, गेल्या चाळीस वर्षाच्या समाजकारणात भरपूर लोकसेवा केली आहे, विकासाचा तर डोंगरच ऊभा केला आहे. श्रेय घेण्यासारखे आता त्यात काय एवढं राहिल नाही. परंतु काहीजण उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अशी संभावनाही त्यांनी केली.
यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यासह कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. एम. एस. बेळगुद्री, रमजान अत्तार, प्रा. शिवाजीराव होडगे, रफिक पटेल, प्रकाश भोईटे, अमृतराव देसाई, दिलीपराव माने, नागेश चौगुले, दत्तात्रय सबनीस, प्रा. एम.एस. मरजे, गणपतराव पाटोळे, सुनिल चौगुले, प्रकाश पवार, महेश सलवादे, गूंडू पाटील, बसवराज आजरी, बाळासाहेब गुरव, काशिनाथ गडकरी, रेखा पोतदार, शेखर यरटे यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास हारून सय्यद, युवराज पाटील, बाळासाहेब घुगरे, दीपक पाटील, रमजान सय्यद, डॉ .किरण खोराटे, रश्मीराज देसाई, रामदास कुराडे, विठ्ठल भमाणगोळ आदी प्रमुख उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here