किरकोळ वादातून युवकाचा मित्राकडून खून

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ येथील तरुणाचा किरकोळ कारणातून मित्राने खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सतीश संजय बसर्गे (वय १९) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मंजुनाथ लक्ष्मण फुटाणे (रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) याला गडहिंग्लज पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मंजूनाथने सतिशवर धारदार शस्त्राने वार केले.

याबाबत अधिक माहिती अशी, सतीश हा मंजुनाथचा जीवलग मित्र होता. शुक्रवारी गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे ते गेले होते. यावेळी गाड्या लावण्यावरून भडगावचे युवक व मंजुनाथ यांच्यात वादावादी होऊन किरकोळ धक्‍काबुक्‍की झाली होती. शनिवारी या वादातूनच गडहिंग्लज येथील संकेश्‍वर रोडवरील पेट्रोलपंपावर मंजुनाथ व भडगावचे युवक एकत्र येऊन भांडण मिटवत होते. याचवेळी सतीश तिथे गेला. झालेला वाद मिटवल्याचे संपूर्ण गावाला कळणार म्हणून मंजूनाथने सतीशशी भांडण केले. याच गोष्टीवरून दोघांत दोन दिवस वाद सुरू होता.

सोमवारी रात्री सतीश दूध घालण्यासाठी हेब्बाळमध्ये डेअरीमध्ये आला असता पुन्हा दोघांत वादावादी झाली. दोघांत जोरदार हाणामारी झाली. याचवेळी मंजूनाथने धारदार शस्त्राने सतीशच्या पोटात जोराचा वार केला. यामध्ये तो जागीच कोसळला. वर्मी घाव असल्याने मोठ्या प्रमाणात रक्‍तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याची वर्दी सतीशचे चुलते रवींद्र बसर्गे यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली. सतीशच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here