मोहोळ येथे बंदिस्त शेळी व संकरित गाई पालन प्रशिक्षणाचे आयोजन

0

महेश गोडगे

मोहोळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शेती पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी, शेतकरी बांधवांसाठी तसेच सुशिक्षित बेरोजगार महिला व पुरुषांना उद्योगाकडे आकर्षित करून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेच्या वतीने बंदिस्त शेळी पालन व संकरित गाई पालन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे चार दिवसीय प्रशिक्षण २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१७ या कालावधीत १२ ते ३ या वेळात संपन्न होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रशिक्षण केंद्राचे मुख्याधिकारी संभाजी घाडगे यांनी दिली आहे. 

              या प्रशिक्षणामध्ये शेळी पालनात शेळ्यांच्या जाती निवड, आहार, व्यवस्थापन, चारा साठवण, आजार व उपचार, शेळ्यांच्या दुधाचे उपयोग, शेळीपालनाचे अर्थशास्त्र, मांस निर्यात संधी आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन लाभणार आहे. तर, संकरित गाई पालनात गाईंच्या जाती, गोठा व्यवस्थापन, कालवड संगोपन, चारा व्यवस्थापन, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, आजार व उपचार आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात परळी, बार्शी, पंढरपूर येथील अनुभवी अशा तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शेळी व गाई पालन माहिती सोबत या प्रशिक्षणातून उद्योजकीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रभावी संवाद कौशल्य, कॉर्पोरेट मार्केटिंग, उद्योगशील व्यक्तिमत्त्व विकास, बाजारपेठ उपलब्धता व विक्री कौशल्य, शेळी / गाई पालन व्यवसायातील संधी, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज व अनुदान माहिती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे असेही घाडगे यांनी सांगितले.

 शेतकऱ्यांना सततच्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर शेतीपूरक व्यवसायाची निवड केली पाहिजे. कमी जागा, कमी चारा, कमी पाणी अशा परिस्थितीत देखील हे व्यवसाय यशस्वी ठरत असल्याने शेळी पालन व गाई पालन सध्याच्या काळात कमी कालावधीत भरपूर अर्थार्जन करून देणारे व्यवसाय ठरले आहेत. त्याचबरोबर सुशिक्षित युवक युवकांना या प्रशिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, या प्रशिक्षणास कोणत्याही शिक्षणाची अट नसल्याने व्यवसाय करण्याची तीव्र इच्छाशक्ती असणारे कोणीही या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकते. सदरचे प्रशिक्षण सशुल्क आहे व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्वरित प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षण ठिकाण कुलस्वामिनी क्लासेस, सरकारी दवाखाण्याजवळ, मस्त फोटो स्टुडिओच्या मागे, मेन रोड मोहोळ येथे आहे. या प्रशिक्षण बॅच मध्ये मर्यादित जागा असल्याने गरजूंनी संस्थेच्या प्रकल्पाधिकारी रोहिणी गोडगे (9422667644) यांच्याशी त्वरित संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे मुख्याधिकारी घाडगे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here