ध्वजदिन : महत्त्व आणि उद्देश

0

शहीद जवानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन दि. 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त ……
स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात 11 नोव्हेंबर रोजी दरवर्षी पॉपी डेसाजरा करण्यात येत होता. त्या दिवशी पेपर पॉपीज वितरीत करून निधी गोळा करण्यात येत होता. ब्रिटीश सैन्यातील माजी जवानांच्या कल्याणकारी कामासाठी या निधीचा वापर करण्यात येत असे. या निधीतला काही भाग त्या वेळच्या भारतीय लष्करातील माजी सैनिकांसाठीही दिला जात असे. स्वातंत्र्यानंतर पॉपी डेला काही उद्देश उरला नव्हता. त्यामुळे याच आधारावर स्वतंत्र भारतातील माजी सैनिक व अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी जमविण्याची कल्पना पुढे आली, जुलै 1948 मध्ये. अन् संरक्षण मंत्रालयाशी संलग्न समितीत ती संमत झाली. 28 ऑगस्ट 1949 रोजी संरक्षण मंत्र्याच्या समितीने 1949 सालापासून दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून लष्करात कार्यरत असलेल्या जवानांबद्दल देशवासीयांची सद्भावना व्यक्त करण्यासाठी लष्करी मोहिमेमध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रतीक असलेला ध्वज प्रदान करून त्या निमित्ताने निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ केला जातो. त्याची सुरुवात ध्वजदिनाच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर पासून होते. हा दिवस आता देशातला एक पारंपरिक आणि राष्ट्रीय महत्त्वाचा दिवस मानला जाऊ लागला आहे.

7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत निधी गोळा केला जातो. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी व त्यांचे जीवन सुसहाय्य व्हावे यासाठी, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या, सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो.

1965 आणि 1971 ची पाकिस्तान बरोबर युद्धे, 1962 सालचे चीनचे आक्रमण, त्यानंतरच्या लष्करी मोहिमा व अलिकडच्या काळात मे 1999 च्या कारगिल युद्धापासून जम्मू-कश्मिर मधील नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाच्या परिस्थितीत आपल्या जवानांनी धैर्याने बहुमोल अशी कामगिरी बजावली आहे. अशा विविध मोहिमांमध्ये लष्कराच्या तिन्हीही दलाचे अनेक जवान व अधिकारी धारातिर्थी पडले आहेत. त्यांचे कुटुंबीय निराधार झाले आहेत. अनेक जवानांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. अनेक घरातील करती माणसे देशासाठी शहीद झाले आहेत. अशा अपंग, माजी सैनिकांना, युद्धात कामी आलेल्या जवानांच्या वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी ध्वजदिन निधीचा वापर केला जातो. अशा कुटुंबियांची जबाबदारी उचलण्याची स्फुर्ती जनतेला मिळावी हा उद्देश ध्वजदिनाचा आहे.

सैनिकांच्या प्रती समाजाचे काही ऋण आहे. देशाच्या सीमांचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करतानाच, देशात उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्था विषयक समस्या, अतिवृष्टी, वादळे किंवा भुकंपासारख्या आपत्तीत दुर्दैवी नागरिकांच्या सहाय्याला त्वरेने धाऊन जाऊन बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या आपल्या सैनिकांचे हे ऋण अल्प स्वरूपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनाच्या निमित्ताने प्राप्त होत असते. युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचे कुटुंबीय आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारांनी अनेक उपाय योजना आणि सवलती लागू केल्या आहेत. तथापि या कामासाठी सरकारी पातळीवरून केले जाणारे प्रयत्न पुरेसे नाहीत. समाजानेही त्यात जबाबदारी उचलावी असे अपेक्षित आहे. आपल्या मागे सारा समाजही उभा आहे. ही भावना माजी सैनिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठीही समाजाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here