अखेर तो अधिकारी निलंबित …

गुटखाबंदीची लक्षवेधी का मांडली याचा राग आलेल्या अधिकाऱ्याची विरोधी पक्षनेत्यांच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी..

0

मुंबई – राज्यातील गुटखाबंदीचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केल्याचा राग आलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आर.डी.आकरुपे यांनी भाजपा आमदारासह विधानभवनातील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात येवून धमकी दिल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला. शेवटी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करत असल्याची घोषणा गिरीष बापट यांनी सभागृहात केली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा आज सभागृहात मांडला. सरकारला विरोधी पक्षाचा आवाज बंद करायचा आहे का ? या अधिकाऱ्यांची हिंमत कशी होते ? असा सवाल करताच  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार कपिल पाटील, आमदार जयवंतराव जाधव हे या मुद्यानंतर आक्रमक झाले आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी केली. त्या अधिकाऱ्याला निलंबित करत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी गोंधळ घातला त्यामुळे दोनवेळा कामकाज तहकुब करावे लागले

राज्यातील गुटखा बंदीचा मुद्दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सरकारने या मुद्दयावर सक्त होत धडक कारवाई सुरु केली होती. मात्र यामध्ये धास्तावलेल्या अधिकाऱ्याने चक्क विधानभवनातील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात येत कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केला. सभापतींनी या घटनेची गंभीर दखल घेत सरकारला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी त्या अधिकाऱ्याला निलंबित करत असल्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here