गडहिंग्लजच्या हद्दवाढीस अंतिम मंजुरी; मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा

कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने अखेर हद्दवाढ

0

 

मुंबई (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज शहर विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या आणि मागील अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीस अखेर अंतिम मंजुरी दिल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री दालनात केली. यावेळी नगर विकास मंत्री रणजितसिंह पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि म्हाडा पुणे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हद्दवाढ जाहीर करताच राजे समरजीतसिंह यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले. या घोषणेनंतर गडहिंग्लजकरानी आनंदोत्सव साजरा करत मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि राजे समरजितसिंह घाटगे यांचे आभार मानले.

गडहिंग्लज शहर हद्दवाढीचा प्रस्ताव गेली अनेक वर्ष रेंगाळत पडला होता. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकर सत्तेत आहे. त्यामुळे या समाजहिताच्या प्रश्नात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे,  आ. हसन मुश्रीफ, आ. श्रीमती संध्यादेवी कुपेकर, विजय देवणे व इतर सर्वपक्षीय नेतेमंडळी  यांनी जातीने लक्ष घातले त्यामुळेच या कामास गती मिळाली.

सात ते आठ महिन्यांपूर्वी गडहिंग्लज शहर हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी यांचे समवेत मंत्रालय मुंबई येथे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने या हद्दवाढी संदर्भात मीटिंग बोलावली होती. या मीटिंगसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगर विकास मंत्री व राजे समरजीत सिंह व काही निमंत्रित उपस्थित होते. यावेळी कोणाची हरकत नसेल तर या प्रस्तावास तत्वतः मंजुरी देत असलेची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली होती.

या हद्दवाढीत गडहिंग्लज परिसरातील काही गावे येत असलेमुळे त्यांची ना हरकत घेऊन जिल्हापरिषद कोल्हापूर व गामविकास खात्याच्या शिफारशीने हा प्रस्ताव नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे पाठण्यात आला होता. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचेही सहकार्य लाभले.अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. शनिवारी मुख्यमंत्री यांनी या हद्दवाढ प्रस्तावास अंतिम मंजुरी दिलेची घोषणा केली. या हद्दवाढीमुळे गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला झाला आहे.

या निर्णयाचे गडहिंग्लजच्या नागरिकांच्या वतीने युती शासनाचे अभिनंदन करणेत आले असून फटाके वाजवून आनंद साजरा करणेत आला.

याबाबत राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रतिक्रिया :

गडहिंग्लज शहर हद्दवाढीमुळे बऱ्याच दिवसाचा आणि ज्या प्रश्नात लोकहीत दडले आहे असा प्रलंबित प्रश्न सुटला. गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला झाला आहे. याचा मनापासून आनंद झाला. इतके दिवस हा प्रश्न मार्गी का लागला नाही या खोलात मी जाणार नाही. पण शेवटी युती शासनाने यास मंजुरी दिली याबद्धल मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री यांचे गडहिंग्लजकरांचे वतीने मी आभार मानतो. या कामात कृती समिती व संबंधित ग्रामस्थ यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here