सैनिकांच्या सत्कारातून सामाजिक दायित्व खा. धनंजय महाडिक; आजर्‍यात अरुण डोंगळे ट्रस्टच्यावतीने माजी सैनिकांचा मेळावा

0

आजरा (प्रतिनिधी) :
जवानांमुळे देशात शांतता नांदत आहे. समाजातील या माजी सैनिक व इतरांचा अरूण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेला गौरव कौतुकास्पद आहे. माजी सैनिकांच्या या सत्कारातून ट्रस्टचे सामाजिक दायित्व दिसून येते, असे गौरवोद्गार खासदार धनंजय महाडीक यांनी काढले. ते आजरा येथे घोटवडे (ता. राधानगरी) येथील अरूण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजीत माजी सैनिक मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रविंद्र आपटे होते. तर गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तविक दत्ता पाटील यांनी केले. खा. महाडीक पुढे म्हणाले, खासदारांचे काम नक्की काय असते, हेच विरोधकांना माहीत नाही. फक्त रस्ते, गटारी पुरते मर्यादीत काम खासदारांचे नाही. संपूर्ण देशाचे प्रश्न खासदाराला मांडायचे असतात. कुणीही माझ्या उमेदवारीची चिंता करू नये. शरद पवार यांच्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे मलाच उमेदवारी मिळणार. निवडणूका जवळ आल्यामुळेच विरोधकांना सामाजिक कार्य सुचू लागले, असा टोलाही त्यांनी हाणला. सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोकुळचे संचालक अरूण डोंगळे म्हणाले, खा. महाडीक यांचे कार्य आदर्शवत आहे. खासदारकीसंदर्भात गैरसमज पसरविले जात आहेत, हे चुकीचे आहे. त्याचबरोबर राधानगरीच्या विकासासाठी योग्य आमदार निवडण्याची वेळ आली आहे. आजरा साखर अध्यक्ष चराटी म्हणाले, निवृत्तीनंतर सामाजिक भान राखणारे माजी सैनिक आहेत. आगामी लोकसभेसाठी महाडीक यांना आजरा तालुक्यातून पाठबळ देणार आहे. रविंद्र आपटे म्हणाले, खा महाडीक यांना मिळालेला संसदरत्न हा पुरस्कार मतदारसंघाचा गौरव आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, सैनिक संघटनेचे आजरा तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोहिते, भुदरगड तालुकाध्यक्ष रघुनाथ देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका अस्मिता जाधव, गोकूळचे संचालक राजेश पाटील, काँग्रेस आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, जनता बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव देसाई, भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, व्ही. आर. पाटील, रविंद्र पाटील, मोहन डवरी, भैय्या डोंगळे, डी. डी. पाटील, राजेंद्र चौगुले, मुकुंद पाटील यांच्यासह माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी केले. आभार जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here