विकासपुरूष इतिहासजमा होतोय ?

1

सुरेश ठमके

सुदृढ भविष्यासाठी इतिहासाचा आधार घ्यावा लागतो, असं म्हणतात. इतिहासाच्या पायावरच वर्तमानाची इमारत उभी असते. तर इतिहासातल्या चुका टाळून भविष्याचा विकासाचा वेध घ्यायचा असा संकेत आहे. पण अलिकडे सगळे जगन्मान्य संकेत पायदळी तुडवायचेच दिवस आहेत की काय, असा प्रश्न पडण्यासारख्या घटना आणि गोष्टी घडताहेत.

इतिहास संशोधन आणि इतिहास पुनर्लेखन या दोन भिन्न पण परस्परांशी निगडीत अशा गोष्टी आहेत. इतिहासाच्या अनेक बाजू असतात. त्याची कारणेही तशीच आहेत. इतिहास हा कुणी एका व्यक्तीने लिहलेली गोष्ट नसते. तर अनेकांनी विविध ठिकाणी विविध संदर्भाने लिहिलेल्या गोष्टी जुळवून तत्कालिन परिस्थीतीशी पडताळून सर्वानुमते आणि सर्वमान्य होणा-या दस्ताऐवजाला इतिहास म्हणून मान्यता दिली जाते. इतिहासातील बाबींबाबत आणि घटनांबाबत क्वचितच वाद उत्पन्न होतात. जोपर्यंत या वादांबाबत सरकार एखादी इतिहास तज्ञांची समिती स्थापन करून उपलब्ध पुरावे आणि संदर्भ यांची योग्य पडताळणी करून सत्य मांडत नाही तोपर्यंत आधीचे संशोधन अंतिम मानले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत असलेला असाच वाद विविध बखरी,आणि इतिहासग्रंथांचे संशोधन करून तारखेचा वाद संपुष्टात आणला गेला, व त्याचे पुनर्लेखन केले गेले.

इतिहास म्हणजे असे घडले… परंतू असे घडले हे सांगणारी व्यक्ती कोण होती, तिचा सामाजिक आणि भौगोलिक संदर्भ काय होता. ती कोणत्या परिपेक्षात वाढली. तिच्यावर कोणाचा अंमल होता अथवा प्रभाव होता, या सा-या बाह्यघटकांचाही विचार इतिहासलेखनावर होत असतो. म्हणूनच चिनी प्रवाशांनी लिहिलेला इतिहास,ब्राम्हण बखरकारांनी लिहिलेला इतिहास, मुघल दरबारातील भाटांनी लिहिलेला इतिहास आणि शाहीरांनी लिहिलेला इतिहास यात फरक आढळतो. कारण प्रत्येकाचा एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मांडण्याची पद्धत सारखीच असते असे नाही. त्यामुळेच शिवजन्माच्यावेळीचे वर्णनही कित्येक ठिकाणी असेच मोघम आढळते. तर आता मुख्य मुद्दा असा आहे की, भाजपप्रणित सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता इतिहासाचे संशोधन आणि पुनर्लेखन करण्याचा मनोद्य व्यक्त केला आहे. अशी कोणती आपदा आली आहे किंवा असा कोणता वाद निर्माण झाला आहे, ज्यामुळे या सरकारला आता इतिहासात काहीतरी संशोधन करण्याची गरज वाटते आहे ? असा कोणता अन्यायकारक इतिहास मांडला जातो आहे, जो नव्याने संशोधन करण्याची अथवा बदलण्याची गरज निर्माण झाली आहे? किंवा तमाम जनतेने इतिहासातील कोणत्या घटनांवर अथवा प्रसगांवर आक्षेप व्यक्त करून ते नव्याने मांडण्याची आणि खरा इतिहास जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. यापैकी काहीही झाले नसताना आणि जनतेतून कोणत्याही इतिहासाबाबत नव्याने जाणण्याची तातडीची आवश्यकता नसताना हा खटाटोप सरकार का करीत आहे, असा प्रश्न, आपसुक निर्माण होतो आहे. जीएसटी, नोटबंदी, महागाई, बेरोजगारी, कलम ३७०,दहशतवाद , नक्षलवाद, या सा-या प्रश्नांच्या गर्तेत अडकलेल्या समाजापुढे हे “ गढे मुर्दे उखाडण्याचे  “ प्रयत्न का होत आहेत. याचाही विचार केला गेला पाहिजे.

उपरोक्त उल्लेखाप्रमाणे इतिहासाची मांडणी ही कित्येकदा तो कोण लिहितोय आणि त्याचे संदर्भ काय आहेत यावर बेतलेली असते. मुघलांच्या इतिहासात स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महराजांना लुटारू आणि मुघल साम्राज्याचा लढवय्या राजा म्हणून औरंगजेबाचा उल्लेख आढळल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण इतिहासाची रचना आणि मांडणी ही सापेक्ष असू शकते. त्यामुळे नव्याने इतिहास संशोधन करण्याची इच्छा व्यक्त करणारे भाजपाचे अमित शाह तो कसा करणार आहेत किंवा त्याना इतिहासाचे कोणते नवे संदर्भ द्यायचे आहेत हे फार महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीला काही बदसुरत रूप तर यानिमित्ताने येणार नाही ना, अशी भाबडी शंका सर्वसामान्य शिवप्रेमींच्या मनात डोकावयला लागली आहे. तीच गोष्ट राज्यातल्या आणि देशातल्या अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेल्या घटना आणि वास्तूंबाबत आहे. कालपर्यंत आम्ही शिकलेला, वाचलेला इतिहास कदाचित कालबाह्य होता किंवा आहे असे कुणी नव्याने इतिहासाचे काही दाखले देत अथवा पुनर्लेखन करीत मांडले तर काय चित्र निर्माण होईल याची कल्पनाच न केलेली बरी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आचार्य आणि गुरूंजींसारखी काही नवी नावे दाखल झालेली आढळतील आणि त्यांनीच कसा स्वातंत्र्यलढा तीव्र केला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले,याबाबतचे दाखलेही मिळू लागतील. कदाचित ज्यांना इतिहास घडवता आला नाही त्यांना तो बदलता येतो, अशी नवी अनिष्ट प्रथा सुरू होऊ शकते.  विकास आता वेडा झालाय, असे विकासचा मित्र म्हणू लागला आहे, विकासच्या मित्राने विकासला जवळून पाहिले आहे. त्यामुळे कदाचित त्याचे हे मत खरे असू शकते. मात्र, देशातल्या ख-या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक न करता जनतेला अशा गोष्टीत अडकून टाकायचे, त्यांचा असा बुद्धीभेद करायचा की दैनंदिन प्रश्नांनी परेशान झालेल्या लोकांच्या सारासार विवेकबुद्धीवर पडदा टाकून त्यांना जगण्याला गैरलागू असलेल्या प्रश्नांवर झुलवत ठेवायचे, असा नवा फंडा देशाच्या विकासकांनी शोधला असावा. या  सा-या नादात अतिशय वाजत गाजत आलेला देशातला विकासपुरूष मात्र इतिहासजमा होतोय, अशी भावना सामान्य जनतेची झाली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here