अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला मनपाचा ब्रेक

0

राजू म्हस्के

औरंगाबाद: तिसर्‍या दिवशी शुक्रवारी दि.10 जयभवानीनगर नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई मंदावली आहे. पुढे अतिक्रणांची संख्या अधिक असून आरसीसीचे पक्के बांधकाम केलेल्या इमारती नाल्यात अतिक्रमित आहेत. पालिकेच्या पथकाने अशा मालमत्ताधारकांना स्वतःहून इमारतीचा अतिक्रमित भाग काढून घेण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी सी.एम. अभंग यांनी सांगितले की, जयभवानीनगर नाल्यात पुढे अतिक्रमणे अधिक आहेत. पूर्णतः नाल्याचा श्‍वास कोंडला गेलेला आहे. नाल्यावर आरसीसीचे पक्के बांधकाम करत नागरीकांनी दोन-तीन मजली इमारती उभ्या केल्या आहे. इमारतींचा काही भाग अतिक्रमित ठरत असल्याने तो पाडण्यास गेल्यास इमारतीचे अधिक नुकसान होऊ शकते. हे नुकसान होऊ नये, यासाठी काही मालमत्ताधारकांनी स्वतःहून अतिक्रमित भाग पाडून घेण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे त्यांना आजचा दिवस सुट दिली. तसेच जे नागरीक अतिक्रमणे काढून घेत नाहीत, त्यांनाही सायंकाळी पुन्हा एकदा समज दिली आहे. पालिकेची कारवाई थांबलेली नाही. शुक्रवारी दिवसभरात 2 अतिक्रमणे हटविण्याचे कारवाई पालिकेच्या पथकाने केल्याचे अभंग म्हणाले. जयभवानीनगर नाल्यावर एकूण 133 अतिक्रमणे आहेत. पहिल्या दिवशी 4, दुसर्‍या दिवशी 14 आणि शुक्रवारी 2 अशी एकूण 20 अतिक्रमणे पालिकेच्या पथकाने आजपर्यंत हटविली आहे. उद्याही कारवाई सुरू राहणार असल्याचे अभंग यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here