कौशल्य विकास योजनेमधून आदिवासी महिलांना रोजगार

प्रकल्पातून आदिवासी भागामध्ये अनेक पटीने रोजगार निर्मितीची शक्यता

0

दत्तात्रय कोकरे
सहाय्यक संचालक (माहिती)
कोकण विभाग.

नवी मुंबई- आदिवासी महिलांना अतिदुर्गम भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला.
हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता होती, यासाठी इतर विभागांच्या सहकार्याने हे स्वप्न साकार होताना दिसत आहे. विशिष्ट उद्दिष्टाने विविध शासकीय विभाग एकत्रित आल्यास काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. या प्रकल्पासाठी महत्त्वाचा असणारा जागेचा प्रश्न जव्हार नगरपरिषदेने विनामुल्य जागा उपलब्ध करून सोडविला. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बोईसरने या प्रकल्पासाठी 200 शिलाई मशिन्स जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागास देण्याची तयारी दर्शविली. त्यातील 50 शिलाई मशिन्सचे दि. 6 जानेवारी 2018 रोजी पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच प्रशिक्षणाचा खर्चही कंपनीने जिल्हा कौशल्य विभागास उपलब्ध करून दिला.
या प्रकल्पामुळे 71 आदिवासी महिलांना पूर्णवेळ रोजगार मिळणार आहे. त्यापैकी 50 महिलांना शिवणकाम व उर्वरित 21 आदिवासी महिलांना पॅकेजींग, फिनिशिंग, कटींग यासारख्या बाबीतून एकूण 71 आदिवासी महिलांना पूर्णवेळ रोजगार मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षणादरम्यान प्रवास भत्तासह स्टायपेंड म्हणून प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत. हे प्रशिक्षण एका महिन्याचे असून त्यानंतर या महिलांना थेट रोजगार उपलब्ध होईल. पूर्णवेळ काम केल्यास एका महिलेला प्रकल्पातून किमान 8 ते 10 हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास खरोखर एक चांगला संदेश तयार होऊन जव्हार सारख्या आदिवासी भागामध्ये अनेक पटीने रोजगार निर्मिती होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here