हत्ती आणि आपण

0

हत्तीची खूसखोरी ही काही न थांबणारी गोष्ट नाही हि गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे नैसगिक अधिवास खाद्य वनस्पती व पिके यांची मुबलकता, तिलारी धरण क्षेत्रातील मुबलक पाणी साठा आणि प्रामुख्याने उत्त्तर कर्नाटकातील जंगलामधील वनाच्या धारण क्षमतेपेक्षा हत्तीची वाढलेली संख्या यामुळे ते विखुरले गेलेत. दक्षिण भारतातील जंगला मध्ये घांनेरी ब राणमोडी या वनस्पतीच्या बेसुमार वाढीमुळे हत्ती तसेच इतर तृणभक्षी प्राण्याचे नैसंगिक अन्न पण कमी झाले आहे, बंदीपूर, मदुमलाई, वायनाड, नागरहोले या वनक्षेत्रामधून हत्ती मानवी वस्ती कडे आले आहेत. पण वन्य जीव व्यवस्थापनामधून चर मारणे, सौर कुंपण, त्वरित पंचनामा व नुकसानभरपाई हत्तीच्या स्थलांतराचा व पारिवारिक जीवनाचा अभ्यास, व प्राचीन काळापासून हा हत्तीचा अधिवास असल्यामुळे हत्ती मानव संगर्ष या ठिकाणी संयतपणे हाताळला जातो. आपल्या कोल्हापूर जिल्हया मधील आजरा, चंदगड हे वनक्षेत्र व तेथील वनसंपदा मुबलक आहे अन्न, पाण्यासाठी नवीन क्षेत्र शोधणे हा हत्तीचा स्वभाव गुणधर्म आहे. खानापूर कनकुंभी व जांबोटी मार्गे व दोडामार्ग मार्गे कोल्हापूर मधील आजरा चंदगड या भागात आलेले हत्ती वनक्षेत्रात आले.ऑक्टोबर २००२ ला हत्तीचे दोडामार्गमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा आगमन झाले तदनन्तर त्याची ये-जा सुरु झाली.२००३-२००४ साली त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात आगमन झाले.नंतर हि मजल आजरा गडहिंग्लज,गारगोटी या तालुक्यापर्यंत झाली.एक हत्ती तर निपाणीजवळ येऊन गेला. पण त्यांचे पालनपोषण  हि विखुरलेली जंगले करू शकत नाहीत हि जंगले कायमस्वरूपी सक्षम नाहीत. खरे तर हत्तीचे स्थलांतराचे मार्ग ठरलेले असतात पण त्यात बदल होत गेला कि ते बिधरतात व या मार्गात अथवा नजीकच्या क्षेत्रामधून माडाच्या झाडांची केळी च्या पिकांची नासधूस करतात तिथे त्यांना परत हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले जातात पण या मूळ समस्येचे निराकरण हे हुसकून लावण्यात नाही तर त्यांचे घर सुरक्षित ठेवण्यात आहे. ऑक्टोबर ते जानेवारी-फेब्रुवारी हे भात मळणी दिवस असतात.यावेळी हत्ती हे शेतात व लोकवस्ती जवळ येतात.तेव्हा ते छोटे-छोटे दल करुन रहातात.व काजू, नारळ व केळीच्या पिकाकडे रात्र होताच आकर्षित होतात.तर नैसर्गिक अधिवासात त्यांना माणगा( बांबू) उपलब्ध होतो. अशावेळी बिकट परीस्थिती निर्माण होते. व  यात मनुष्य व हत्ती या दोहोंचेहि नुकसान होते.मुख्य म्हणजे वन विभाग सातत्याने जंगलीहत्तीच्या कळपावर नजर  ठेवून होता. त्यांच्या पारीवारीक जीवनाचा अभ्यास करणे व जंगलात परत त्यांना हुसकावून लावणे.हे काम सातत्याने करत असतात. जंगली हत्तीचा अभ्यास करणे व परत त्यांना नैसर्गिक अधिवासात परत हाकलून देणे हि सोपी  गोष्ट नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण ओडिशा, तामिळनाडू,केरळ, मध्यप्रदेश, उत्तराचल, आसाम या ठिकाणी हत्ती पूर्वापार आहेत तेथील समुदायाला वनकर्मचाऱ्यांना हत्तीच्या सवयीचा अभ्यास आहे त्यांनी हत्तीसमवेत सहअस्तिव स्विकारले आहे परिणामी ते आपल्या जीवाची योग्य ती काळजी घेऊन दैनदिन व्यवहार करीत असतात. आपल्याकडे शेतीही तुकड्यातुकड्यात विभागली असलेने शेतीचे सामुहिक संरक्षण हि बाब होत नाही.

जंगलामध्ये जे त्यांना मिळणार नाही, मिळत नाही, कमी पडतय ते पोषक वातावरण बाहेर मिळाल्यास हत्ती त्याचा शोध घेतात त्यांची स्मरणशक्ती तीव्र असते अशा ठिकाणी ते परत परत येतात हे आपण पहात आहोत  हत्तीना चारा व पाणी मोठ्या प्रमाणात लागते त्यांमुळे हत्तीचा वावर हा शेती क्षेत्राजवळ व  त्याना आवडणाऱ्या पिकांच्या क्षेत्राजवळ रहाणार आहे. हत्तीच्या महाकाय आकाराने व वजनाच्या मानाने दिवसाच्या २४ तासामधील दोन तृतीयांश कालवधी( १८ तास हा खाण्यापिण्यातच जातो ) एवढे मोठे पोट भरण्यासाठी तेवढा कालावधी हा लागतोच जेवढे खायचे तेवढे विष्ठेतून विसर्जन करावयाचे हा हत्तीचा स्थायीभाव आहे. परिणामी जंगलामध्ये खाद्य वनस्पती शोधण्यासाठी जे स्थलांतर करुन १०-१२ तास हत्तीला खर्च करावे लागतात त्या पेक्षा कमी वेळात कमी श्रमात शेतामध्ये चारा व पिकांच्या स्वरूपात आहार उपलब्ध होतो आहे.वायंगणी भात शेती, उस, केळी, नारळ या पिकांवर हत्ती येतो. शेत पिके उद्ध्वस्त करण्यात नर हत्ती अग्रभागी असतात.हत्ती मानव संघर्ष या शब्द प्रयोगाकडे कायम हत्ती माजावर येण्यातून व पिसाळन्यातुन उद्भवणारी समस्या  तसेच त्याच्या अधिवासाच्या  उपलब्ध खाद्य वनस्पतीच्या दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे.कारण आपल्या भागाकडे आलेल्या हत्तीचे वितरण हे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभागले गेले आहे. कारण तज्ञांच्या मते हत्ती व्याप्त क्षेत्राला मर्यांदा नसतात हत्ती हा एका वन क्षेत्रात राहणारा प्राणी नाही त्या ठिकाणी तो स्थिर राहूच शकत नाही विशिष्ठ प्रदेशात त्याचा बंदोबस्त हि एक तात्पुरती मलमपट्टी आहे हा अनुभव पण आपण वेळोवेळी घेतला आहे. हत्ती पिकांच्या संरक्षणासाठी मारणे, मारला जाणे, तर काही ठिकाणी हत्ती कडून माणूस मारला जाणे हे एक चक्र गेल्या १०-१२  वर्षापासून सुरु आहे.सिंधुदुर्गमध्ये   आसामच्या वन्य जीव अभ्यास गटाने हत्ती पकडून परत वन्यक्षेत्रात सोडले होते पण ते माघारी आले तदनंतर डॉ उमाशंकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग येथील हत्तींना रानटी हत्तीमार्फत पकडण्याची अवघड मोहीम हि यशस्वी झाली होती. आकेरी येथे हे पकडण्यात आलेले हत्ती कुणकिज आंबेरी फॉरेस्ट चेकपोस्ट या ठिकाणी  ( प्रशिक्षित करण्यात येणार होते ) पण दोन हत्ती हे मरण पावले तर एक कर्नाटक या ठिकाणी पाठविण्यात आला.

हत्तीसारखा समाजप्रिय प्राणी हा कळपाने राहणारा कुटुंबवत्सल व संवेदनशील असतो लहान पिल्लांच्या सुरक्षेबाबत ते विलक्ष्ण आक्रमक असतात. थोडी जरी असुरक्षितता व शंका आली तर ते बेगुनामपणे हल्ला चढवतात तसेच माजावर आलेल्या जोडीला व्यत्यय केल्यास ते आक्रमक होतात.हत्तीच्या कुटुंबाला सलग असे जंगल हवे असते. ते किमान ६०० वर्ग कि.मी चे क्षेत्रतरी हवे पण हे अखंड क्षेत्र मिळत नाहीत परिणामी त्याच्या संचार क्षेत्राला मर्यादा येतात  आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश येथील वनानजीक रहाणारे वन कर्मचारी, आदिवासी समुदाय यांना हत्तीच्या पारिवारिक जीवनाचा अभ्यास मुलभूत सवयी, माहीत असलेने ते योग्य काळजी घेऊन काम करीत असतात. कर्नाटकामधील गेल्या काही वर्षात हत्तीच्या वितरणाचा पद्धतशीर अभ्यास करुन त्यांच्या हालचालीचा व पारिवारिक जीवनाचा अभ्यास करणे यावर वन्य जीव अभ्यासक व हत्ती संशोधक मधुसदन यांनी भर दिला आहे.

पश्चिम घाटांतील दक्षिण पश्चिम घाटातील कोल्हापूर जिल्हा हा वनसंपदेने संपन्न आहे सह्याद्रीतील १३ जिल्हयामधील सर्वाधिक जैव विविधता हि कोल्हापूर जिल्हयामध्ये आहे. हत्तीप्रवण तिलारी वनक्षेत्रात अलीकडेच वाघिणीने ३ पिल्लांना जल्म दिला हि वन्यजीवांच्या दृष्टीने गौरवशाली बाब आहे. वाघाव्यतिरिक्त बिबटे, रानकुत्री, रानमांजर, कोल्हा, हे मांसभक्षी प्राणी तसेच सांबर, भेकर, अस्वल, गवे, रानडुक्कर, शेकरू, स्लेडर लोरीस, वानर, माकडे,  ससे, पिसोरी या वन्य प्राण्यांनी तिलारीचे जंगल संपन्न आहे. वन्य जीव संरक्षित क्षेत्र घोषित करण्यासाठी संशोधन पाठपुरावा सुरु आहे. हा भाग संरक्षित करण्याबरोबरच मानवजातीचेहि स्थानिकांचे कल्याण आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, जल विद्युत प्रकल्प. औषधी वनस्पती. जंगली वाणांचे संरक्षण व संवर्धन व शास्वत विकासाच्या अंगाने जैव विविधतेची जपणूक कॉरिडोर जपणे ( दोन जंगलांना जोडणारे भूभाग ) जे वन्य प्राण्यांच्या स्थलांतरामध्ये महत्वाची भूमिका बजावतात यामध्ये नो गो एरीया जाहीर करणे , मानवी हस्तक्षेप टाळणे, एकसुरी झाडांची लागवड ( मोनो कल्चर ) न करणे यामध्ये  तेल्या ताड ( पाम तेल) रबर, निलगिरी, म्यांजीयम, ऑस्ट्रोलीयन बाभूळ या मुळे स्थानिक वनस्पतीवर परिणाम होतो आहे मृदा संपत्तीचा नाश होतो आहे अल्पकालीन फायद्यासाठी स्थानिक वनस्पतीची तोड करुन या विविध  विदेशी वनस्पतीच्या  अट्टाहासामुळे अमूल्य नैसगिक साधन संपत्तीचा नाश होतो आहे कोकण पट्ट्यात खासगी जमिनीवर रबर,पामतेल,या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे  व या मुळे हि वन्य प्राण्यांच्या स्थलांतरा वर तसेच अधिवासा वर गदा येत आहे. आज गरज आहे मानव आणि हत्ती यांच्यामधले संबध बिघडण्यास कारणीभूत होणारे परिसर असुंतलन आणि त्या बिघडलेल्या संबंधाना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी करावयाचे प्रयत्न यासाठी दीर्घकालीन उपायाची गरज आहे. धोरण ठरवणार्यांनी व लोकप्रतीनिधी नी यामध्ये योग्य समन्वय घडवून आणावयास हवा.  वन्यजीव व वन विभागाकडून पंचनामा तातडीने नुकसानभरपाई व उपाययोजना या गोष्टी आत्यंतिक महत्वाच्या आहेत. प्रशिक्षण, प्रशिक्षित कर्मचारी. टेहाळणी, गस्त व हत्तीच्या स्थलांतराचा गेल्या काही वर्षातील अभ्यास. जंगलांतच रहाणारे व जंगलाची पुरेपूर माहिती असणारे स्थानिक, प्रशिक्षित सुरक्षारक्षक अशांची दले उभारण्याची आवश्यकता आहे.कारण हे काम आपल्या कडील जंगलाच्या भौगोलिक रचनेमुळे अवघड आहे  कोईमतूर येथील अन्नामलाई पर्वत रांगांमध्ये वन विभाग व नेचर कॉन्झरवेशन ग्रुप च्या वतीने इन्फोरमेशन नेटवर्क उभारले असून हत्तीच्या स्थलांतराचा शेतीकडे कूच करण्याच्या पद्धतीचा शास्त्रीय पध्द्तीने अभ्यास करुन त्याची माहिती स्थानिक टी.व्ही च्यनेल वर दाखवून लोकांना सतर्क केले जाते.सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एसयमएस पाठवून लोकांना सतर्क केले जाते. लाल रंगाच्या सर्च लाईट टाकून लोकांना जागरूक केले जाते असे अनेक सर्च लाईटस टोवर हत्ती व्याप्त क्षेत्रात उभे केले आहेत.बंदीपूर नशनल पार्क कर्नाटक येथे खंदक, सौर कुंपणे तेथील हत्तीच्या सवयीचा हालचालीचा अभ्यास करुन स्थानिक लोकांच्या व स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने घातली गेली जाऊन संघर्ष कमी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील मानद वन्यजीव रक्षक प्रा. नागेश दफ्तरदार यांनी कुडाळ, माणगाव या ठिकाणी हत्तीव्याप्त क्षेत्राचा अभ्यास करुन, स्थानिक व वनविभागाच्या धोरणांचा समन्वय करुन.संघर्ष कमी करण्यात यशस्वी ठरलेत.

हत्तीचे स्थलांतर ( ट्रान्सलोकेशन ) हा एक पर्याय शिल्लक रहातो. जुजबी उपाय करुन प्रश्न सुटणार नाहीत दीर्घकालीन उपांयाची गरज आहे. हत्तीच्या स्थलांतरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात  मुठभर लोकांनी शेकडो एकर जमिनी संपादित केल्या आहेत त्या बागायती क्षेत्रासाठी वनावर आक्रमण करुन जमिनी सपाट केल्या आहेत. हत्तीचे नैसर्गिक स्थलांतर त्यांच्या जमिनीच्या आड येत आहे  कारण तेथील स्थानिक समुदायाचे जे नुकसान होते व त्यांच्या आर्थीक सामाजिक जीवनमाना वर परिणाम होतो. व त्या समुदायाला पिडीत शेतकर्यांना नुकसान भरपाई हि योग्य योग्य वेळी व सन्मान जनक मिळत नाही.ती तातडीने मिळाल्यास हत्तीविरोधी लोकमत कमी होण्यास मदत होईल  ज्या ठिकाणी हत्ती सातत्याने येतो आहे त्या ठिकाणी त्याला स्वीकारणे हे व्यवहार्य आहे. मदुमलाईच्या जंगलात भात शेती ऐवजी आल्याची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे . भात शेती हि  दैनदीन गरजेपुरती केली जाते. जमिनीच्या वापरामध्ये काही बदल करणे हि व्यवहार्य आहे.परराज्याच्या मदतीने एकत्रित योजना आखणे.

मानव आणि हत्ती हा संघर्ष संपूर्ण भारतभर हत्तीव्याप्त प्रदेशात आहे. दरवर्षी सुमारे ४०० व्यक्ती हत्तीच्या हल्ल्यात दगावल्या जातात. तर साधारण १०० हत्ती मरतात,मारले जातात  पारंपारिक रित्या हजारो वर्षा पासून ज्या क्षेत्रात हत्तीचा अधिवास आहे त्या क्षेत्राव्यतीरिक्त महाराष्ट्र ,छत्तीसगड, गोंवा, आणि मध्य प्रदेश हे  हत्तीचे पारंपारिक भूक्षेत्र न्हवते पण गेल्या २० वर्षात व महाराष्ट्र(सिंधुदुर्ग – कोल्हापूर ) व गोवा या दोन राज्यात गेल्या १५ वर्षात हत्तीचे आगमन झाले असून, पारंपारिक हत्तीची भूमी म्हणून पश्चिम बंगाल, ओडीशा व कर्नाटकातील हत्तींनीहि नवीन भूप्रदेशाकडे कूच केली आहे.

हत्तीचे मूळप्रदेश ( होम रेंजस ) आणि त्यांची स्थलांतरे हि शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यासली जातात. पण गेल्या १० -१५ वर्षात होम रेंज सोडून ते जंगलव्याप्त मानवी वस्तीनजीकच्या शेती कडे आकर्षित झाले आहेत. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हयामध्ये आलेले हत्ती हे कर्नाटकातील दांडेली अंशी व्याघ्र प्रकल्पा मधील तेथील खाणकाम व जल विद्युत प्रकल्पामुळे व इतर निओजित प्रकल्पामुळे न अन्नाच्या शोधाथ सरकले तर काही  उत्तर गोव्यातील भागाकडे आले. २००६ पासून हत्ती हे सिधुदुर्ग मुक्कामी होते.

 

हत्ती हा आपल्या सांस्कृतिक, धार्मिक जीवनामध्ये महत्वाचा आहे त्याचबरोबर त्याचे निसर्गचक्रातील स्थान हि महत्वाचे आहे. हत्त्तीच्या विशाल सुल्याला अस्वल वाघ सारखे प्राणी हि घाबरतात ते हत्तीवर चालून जात नाहीत, इतर तृणभक्षी प्राणी हरीण, सांबर, चितळ, रानडुक्कर हत्तीच्या आसपास चरत असलेने ते सूस्थितीत रहातात.हत्तीसमवेतचे सहअस्तिव असले कि किमान आपण जगू शकतो हे या तृणभक्षी प्राण्यांना उपजत माहित असते. हत्तीचे भटकती पट्टे दूरवर असलेने त्या भागात दुसरा कळप येईपर्यंत ती वनसंपदा निसर्गचक्राने परत निर्माण होत असते. पण असे सलग पट्टे आपल्या भागात नाहीत यामुळे तात्पुरते उपाय करुन संभावित नुकसान टाळू शकतो

 

सुहास मा.वायंगणकर

वन्य जीव अभ्यासक

०९४२१२९०११२, ९१७२७१३१११

wsuhasan@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here