राजस्थानमध्ये परंपरा कायम राहणार की इतिहास घडणार ?

राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी मतमोजणी होणार असून बहुमतासाठी १०० जागांची आवश्यकता आहे.

0

 

दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी-फायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याचवेळात सुरु होईल. एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे राजस्थानमध्ये दर ५ वर्षांनी सरकार बदलणार की यावेळी इतिहास घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल नाराजी असल्याचे दिसून आले. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कसून परिश्रम घेतले आहेत. तर राजस्थानात सत्ता कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला होता. राजस्थानमध्ये २०० मतदारसंघ असून १९९ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. येथे बहुमतासाठी १०० जागांची आवश्यकता आहे. राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला एकूण ७४.२१ टक्के मतदान झाले. तर २०१३ मध्ये ७५.२३ टक्के मतदान होते. राज्यात एकूण ४,७४,३७,७६१ मतदार असून एकूण ३३७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे २९ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती.
२०१३ मध्ये भाजपाला मिळाल्या होत्या १६३ जागा
राजस्थानमध्ये २०१३ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकूण १६३ जागा मिळाल्या होत्या.

सर्वांत प्रथम पोस्टल मतांची मोजणी
पोस्टल मतांची सर्वांत प्रथम मोजणी होणार. त्यानंतर ईव्हीएममधून मोजणी होणार.

२० हजार कर्मचारी तैनात
मतमोजणीसाठी सुमारे २० हजार कर्मचारी तैनात, सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरुवात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here