मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याने ही अवस्था झाली; एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खदखद

0

जळगाव (प्रतिनिधी) :

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि माझी ही अवस्था झाली असं म्हणत माजी मंत्री आणि भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपण जेव्हा मंत्रिपदावर होतो, तेव्हा जाती धर्माच्या आधारावर नाही तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून कायमच मुस्लिम समाजाच्या पाठिशी उभं रहाण्याचा प्रयत्न केला असंही खडसे यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने एक ‘शाम नाथाभाऊ के नाम’ हा मुशायराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिल्याने माझी ही अवस्था झाली असं खडसेंनी म्हटलं आहे.

मंत्रिपदाचं काही विशेष नाही. चाळीस वर्षांच्या कालावधीत अनेक मंत्रिपदं भुषवली असं खडसे यांनी म्हटले. ज्यानंतर एका मुस्लिम कार्यकर्त्याने आगामी काळात तुम्हालाच मुख्यमंत्री झालेलं पहाण्यास आवडेल असं म्हटलं. ज्याला उत्तर देताना मी मुख्यमंत्री पद मिळेल हे स्वप्न पाहिल्यानेच अशी अवस्था झाली. कोणताही गुन्हा केलेला नाही असंही खडसे यांनी म्हटलं.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. महसूलमंत्र्यांच्या कुटुंबीयांनीच रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी केल्याने संशय निर्माण झाला. या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरु झाला. याप्रकरणी खडसेंची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आणि शेवटी खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी अनेकदा भाजपाविरोधी वक्तव्यं केली. ते भाजपा सोडणार की काय अशीही चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी पक्षातच थांबणं पसंत केलं. आता मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिल्यानेच आपल्यावर ही वेळ आली हे खडसेंनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here