शेंदूर्णी येथे नगरपालिका स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु – गिरीष महाजन

तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदूर्णीतील मंदिरांचा पुनर्विकास करणार

0

जळगाव : प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदूर्णी गावात शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास योजनेतून गावांतील सहा मंदिरांचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याने येत्या वर्षभरात शेंदूर्णीचा कायापालट झालेला बघायला मिळेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.

शेंदूर्णी, ता. जामनेर येथे पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्यावतीने सोननदीला पूर संरक्षण भिंत बांधणे, विविध मंदिरांचे पायाभरणी, स्टेशन ते स्टेट बँकेपर्यंत चौपदरी रस्ता व बारी समाज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा, माळी समाज मंगल कार्यालयाची पाहणी, सूर्यवंशी गुजर समाज मंगल कार्यालयाचे भूमीपूजन समारंभ जलसंपदामंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन हे सर्वसामान्यांचे शासन आहे. या शासनाने गेल्या तीन वर्षात विविध विकास कामे केली आहे. शेंदूर्णीला तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून गावात मंदिरांच्या विकासासाठी 16 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सोननदीवर सर्व बाजुंनी संरक्षण भिंत बांधण्यासाठी 7 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. स्टेशन ते स्टेट बँकेपर्यंत चौपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. शेदूर्णी गावाची लोकसंख्या लक्षात घेता या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर येथे अद्ययावत एस. टी. स्टॅन्ड बांधण्यासाठी प्रयत्न करु. चांगल्या रस्त्यांमुळे व्यापार व उद्योगाला चालना मिळत असल्याने पाचोरा-शेंदूणी-पहूर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी भागपूर योजनेचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून गणेशपूर धरणात येत्या पावसाळ्यात पाणी साठविले जाणार असल्याचेही श्री.महाजन यांनी सांगितले. मंदिरे ही आपली शक्ती केंद्र असल्याने शेंदूर्णीतील दत्त मंदिर, शनि मंदिर, रोहिदास मंदिर या मंदिरांचा पुनर्विकास तसेच माळी व गुजर समाजाच्या समाज मंदिरांचे भूमिपुजन व बारी समाजाच्या मंदिराचे लोकार्पण मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्‍ज्वला योजनेतंर्गत गावातील महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात गॅस शेगड्यांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here