पारगडावर पर्यटकांची पाण्यासाठी वणवण

0

चंदगड : किल्ले पारगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील पाणी समस्या दूर करावी, अशी मागणी रघुवीर शेलार यांनी किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर पारगड किल्ला आहे. गडकोट किल्ले म्हणजे शिवरायांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र सरकारने पारगड किल्ला पर्यटक स्थळ म्हणून जाहीर केला. काही वर्षांपूर्वी या भागात आमदार कै. बाबासाहेब कुपेकर यांनी नळपाणी योजना राबवली होती. लाखो रुपये खर्च केले गेले. पण तेथील पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे ही नळ योजना बंद पडली. येथील लोक विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर येथील खडकात तळी आहे. त्याचे पाणी आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, धुणीभांडीसाठी वापरतात. पारगड किल्ला येथे दर दिवशी शेकडो पर्यटक तसेच शाळा कॉलेजमधील विद्यार्थी सहली घेऊन येतात. अशा पर्यटकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. किल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. पूर्वी नळपाणी योजना राबवली तेथून एक किलो मीटर अंतरावर वन खात्याच्या हद्दीत बारमाही वाहणारा नाला आहे. येथे मोठी नळयोजना राबवली तर जंगली जनावरे तसेच पारगड किल्लावासीय तसेच पर्यटक यांची गैरसोय दूर होणार आहे. पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here