दौलत साखर कारखाना चालविण्याची दोन संस्थांची तयारी

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ताब्यातील हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाड्याने देण्यासाठी मागवण्यात आलेल्या दोन निविदा सोमवारी उघडण्यात आल्या. कारखाना भाड्याने कुणाला द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत निविदा ठेवण्यात येणार आहेत. चंदगड तालुका संघ आणि अथर्व ट्रेडर्स या दोन संस्थांनी निविदा भरल्या आहेत.

कारखाना भाड्याने देण्यासाठी जिल्हा बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. निविदा भरण्याची शनिवारी (दि. २) अंतिम मुदत होती. या कालावधीत दोनच निविदा आल्या. सोमवारी या निविदा उघण्यात आल्या. अथर्व ट्रेडर्सने बँकेच्या शर्ती व अटी मान्य करत ३९ वर्षे कारखाना चालवण्यासाठी तर चंदगड तालुका संघाने ४० वर्षे कारखाना भाड्याने घेण्याची तयारी दर्शवली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी लवकरच संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.

यापूर्वी बँकेने न्यूट्रिएन्स कंपनीला ४५ वर्षे कराराने दौलत कारखाना भाड्याने दिला होता. पण कंपनीने अटी व शर्तीचा भंग केल्याने बँकेने कंपनीशी असलेला करार रद्द केला. तसेच कारखाना भाड्याने देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. बँकेच्या कारवाईविरोधात न्यूट्रिएन्सने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी याचिकेवर सुनावणी होती. पण न्यायालयाने गुरुवारी (ता. ७) सुनावणी ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here