शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, आत्महत्या हा पर्याय नाही – शरद पवारांचा शेतकऱ्यांना धीराचा सल्ला…

0

यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज यवतमाळच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज मांगलादेवी ( नेर तालुका)  गावातील शेतकरी श्याम उघडे यांच्या शेताला भेट दिली.

 आपल्या शेतातील बोंड अळीमुळे उध्वस्त झालेले पीक श्याम उघडे यांनी शरद पवार यांना दाखवले. बोगस बीटी बियाणे वापरल्यामुळे आमचे पीक वाया गेले. कपाशीसाठी खर्च केलेले सर्व पैसे वाया गेले त्यामुळे जगावे कसे अशी व्यथा श्याम उघडे यांनी मांडली. सरकार किंवा कृषी खात्याचे कुणीही नुकसानीची पाहणी करायला आलेले नाही. आम्ही आत्महत्या केली तर सरकार दोन लाख देईल पण नुकसानीची दखल घ्यायला मात्र त्यांना वेळ नाही असे सांगतानाच श्याम उघडे हे शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडले.

 यवतमाळ व विदर्भात कपाशी आणि सोयाबीन हे  महत्वाचे पीक आहे. त्यामुळे सरकारने आतापासूनच पुढच्या वर्षाची तयारी केली पाहिजे. राजकारण बाजुला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. मला राजकारणात इंट्रेस्ट नाही. मला शेती, शेतकरी यामध्ये इंट्रेस्ट आहे असे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले. ज्या अधिकाऱ्यांनी बियाणे प्रमाणित करण्याची प्रक्रिया नीट केलेली नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी राज्यसरकारने महसूल विभागामार्फत नुकसान झालेल्या शेताचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी केंद्र व राज्यसरकारशी बोलणार असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा अशी विनंती करणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका,आत्महत्या हा पर्याय नाही असा धीराचा सल्ला दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here