आश्चर्य वाटायला नकोच …

0

सुरेश ठमके :-

नियम किंवा सिद्धांत अपवादाने सिद्ध होतात, असे म्हणतात मी गेल्या काही वर्षांपासून काही नियम सिद्ध होण्यासाठी तरी अपवाद घडतो आहे का आली याची वाट पाहतोय, पण माझ्या आणि माझ्यासारख्या पापभीरु समाजाच्या दुर्दैवाने असा होताना दिसत नाहीये. “सत्तातुरं ना भय ना लज्जा” पंक्ती कधीतरी खोटी ठरेल, किमान अपवादाने का होईना तसे घडेल हि आशाही अलीकडे मावळत चाललीये.
करवीर नगरीतील एका साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात बोलताना सरकारमधील एका वजनदार मंत्र्याने फारच साखरपेरणी (कि जनतेचा केसाने गाला कापला) केली, कि आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलीतर आश्च्यर्य वाटायला नको, अशी (निर्लज्ज) शक्यता मोठ्या दिमाखात व्यक्त केली. खरंच पाटीलसाहेब तुमच्या राज्यात आता काहीही घडले तरी आश्चर्य वाटून घ्यायचे नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात तुम्ही आणि तुमचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार यशस्वी झाले आहे.
‘घरचीला नागडी बसवून बाहेरच्याला लुगडी’ घेण्याचा तुमच्या या प्रवृत्तीला आणि खेळामुळे निष्पाप जीवांचा बळी गेला तरी तुम्हाला त्याचे काही सोयरसुतक आहे असे दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या जिवापेक्षा गुजरात नीती आणि मोदीभक्ती अधिक प्रिय वाटायला लागलीये तर खरंच आश्चर्य वाटायला नको. मुंबईतील लोकलच्या प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या वाढत्या गरजा यांकडे रेल्वेने कानाडोळाच केला आहे. मुंबईतील रेल्वेमार्गावरील अनेक पादचारी पूल कमकुवत आहेत. अनेक पादचारी पूल अरुंद आणि धोकादायक आहेत गाडयांची संख्या आणि फेऱ्या यांची फेररचना करण्याची गरज आहे. याबाबत प्रवाश्यांनी वारंवार मागणी करूनही कधी लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मांडूनही त्याबाबत ना ‘प्रभुला’ दया आली ना ‘पियुषला’ पान्हा फुटला…अखेर सरकारच्या या निष्काळजीपणाचा फटका निष्पाप प्रवाशानाचं बसला… एल्फिन्स्टनच्या-परळच्या अरुंद पुलावर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन २3 जणांना आपले प्राण गमवावे लागले. पण हि सरकारी बेफिकीरी सत्ताधाऱ्यांच्या माजातून जन्माला आलीये, त्यामुळे त्याबाबत आश्चर्य वाटायला नकोच, हे आता भाबड्या प्रवाशांनी टाहो फोडणे बंद करायला हवे. शेतकर्यांच्या कर्जमाफीचा घोळ मिटतात मिटेना त्याबद्दल बोलूच मात्र, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला कोट्यवधी रुपये देण्याची तयारी दर्शवायला फडणवीसांना क्षणाचाही विलंब लागला नाही. मुंबईतील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून मोदींच्या इशाऱ्यावर गुजरातवर कोट्यवधींची उधळण करायला निघालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अजब निर्णयाबद्दल आश्चर्य वाटायला नकोच.
अशा दुर्घटनांमध्ये दगावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत दिली म्हणजे आपले कर्तव्य संपले अशीच भावना अलीकडे राज्यकर्त्यांची दिसून येतीये, कायमस्वरूपी उपाययोजना करून अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यायची असते हे दुर्घटना घडण्यापूर्वी सरकारला का वाटत नाही! या दुर्घटनांतर केइम रुग्णालयात घडलेला प्रकार अत्यंत अमानुष होता, मृतांची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी मृतांच्या कपाळावरचं क्रमांक लिहून मानवतेची विटंबनाच केली. त्यांच्या कृतीवर सर्व स्तरावर टीकेची झोड उडाली तरी आपल्या कृतीचा समर्थन करणाऱ्या पोलिसांच्या अमानवीय वागण्याचे आश्चर्य वाटायला नको…
या घटनेनंतर साहिजकच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी अपेक्षेप्रमाणे सरकार विरोधात टीकेची झोड उडवली. दोषींवर कारवाई कारवाई करण्याची मागणी केली अपवाद फक्त रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही याचा. मात्र शिवसेना या सत्तेतील विरोधी पक्षालाही आणखी एक मुद्दा मिळाला. त्याचा योग्य वापर मातोश्रीवरून झाला नसता तर नवल… यावेळी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘राजगडालाही’ जाग आली. मुंबईला वाऱ्यावर सोडून गुजरातच्या पक्षात बुलेट ट्रेनचे मॅप टाकणाऱ्या सरकारला त्यांनी चांगलेच धारेवर धरले. बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही,असा इशारा त्यांनी दिला. याच राजसाहेबांनी लोकसभा निवडणुकीत बाळा नांदगावकरला भाजपला म्हणजेच मोदींना बळकट करण्याचे आवाहन करायला सांगितले होते. गांधीजी म्हणायचे त्याप्रमाणे ‘माझे आजचे वक्तव्य कालच्या वक्तव्यापेक्षा वेगळे असेल तर आजचे वक्तव्य प्रमाण माना’ त्यामुळे राज यांच्या बदलत्या भूमिकेचे(एकूणच राजकारण्यांच्या) आश्चर्य वाटायला नको…
तर मुळ मुद्दा असा की,चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादी येत्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊ शकले आम्हाला कुणाचेही वावडे नाही, असे अगदी छातीठोकपणे सांगितले आहे, चंद्रकांतजी तुमच्या आतापर्यंतच्या राष्ट्रवादीबरोबरच्या घरोब्याचे राष्ट्रवादीतल्या भ्रष्ट नेत्यांचे शुद्धीकरण करून त्यांना पक्षात घेण्याचे, तसेच शिवसेनेला अस्वस्थ करणाऱ्या या तुमच्या वक्तव्याचे आणि राजकीय अनैतिकतेचे खरच कुणालाही आश्चर्य वाटणार नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here