निरीक्षण आणि स्वभ्यासातून ऊस शेती करा: कृषिभूषण सुरेशआण्णा कबाडे

0

निरीक्षण आणि स्वभ्यासातून ऊस शेती करा: कृषिभूषण सुरेशआण्णा कबाडे
मुरगूड प्रतिनिधी
ऊस उत्पादकांनी केवळ इतरांचे अनुकरण करून शेती करण्यापेक्षा निरीक्षण,अभ्यास आणि स्वयंनिर्णयातून ऊस उत्पादन घ्यावे.अंधानुकरण टाळावे कॉमनसेन्सचा वापर करून सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक पद्धतीचा योग्य समन्वय साधून केलेली शेती अधिक फायदेशीर ठरते असे प्रतिपादन कारंदवाडी आष्टा कृषिभूषण ऊस उत्पादक सुरेशआण्णा कबाडे यांनी केले.
सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी बेलेवाडी काळम्मा व नेटाफीम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या ‘ऊस पीक व्यवस्थापन’ चर्चासत्रात बोलत होते.अध्यक्षस्थानी दलीतमित्र डी.डी. चौगले होते.
कृषीभूषण कबाडे यांनी चर्चासत्रात मौलिक मार्गदर्शन केले.सलग दहा दहा वर्षे पाचट न जाळता घेतलेल्या जैविक खताचा मातीतील जैव घटक वाढवण्यास उपयोग होतो.रासायनिक खते फेकून पुरवण्याची पद्धत चुकीचे आहे.त्या ऐवजी खते माती आड करावीत.पिकपालट करून सोयाबीन,हळद,केळी,हरभरा पिके घेतल्यास जमीन सुधारते.स्वतःच्या निरीक्षण अभ्यासातून शेतकऱ्यांनी आपले पीक मॉडेल विकसित करावे.एकाच पारंपरिक पद्धतीला न चिकटून राहता आपल्या शेत जमिनीला साजेशी पद्धत स्वतः विकसित करावी. अशा प्रकारे एकरी 100 ते 120 टन ऊस घेण्याचा पराक्रम अनेक शेतकरी करत आहेत. यावेळी ठिबक सिंचन व्यवस्थापन या विषयावर विकास गरुड यांचे व्याख्यान झाले.
स्वागत ऊस विकास अधिकारी उत्तम परीट प्रास्ताविक शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे यांनी केले.यावेळी शामराव घाटगे,रणजित सूर्यवंशी,एम एस पाटील,आबासो खराडे,महंतेश पाटील,नामदेव एकल,प्रगतिशील शेतकरी गिरीश कुलकर्णी,विजय मगदूम,सूर्यकांत दोरुगडे,संजय बुजरे,शहाजी पाटील,रघुनाथ वारके,एस.एस. इनामदार,विशाल चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विकी बोरगावे आभार उदय पाटील यांनी मानले.

होय आम्ही शेतकरी….
युवकांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि व्यवसायिक पद्धतीने शेती करण्यासाठी योग्य मशागत,तंत्रज्ञान,खते, पाणी,ठिबक,पर्जन्य,जलव्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘होय आम्ही शेतकरीच’ नावाचा व्हॉट्सअप ग्रुप डॉ अंकुश चोरमुले, सुरेशआण्णा व प्रगतिशील शेतकरी अमोल पाटील यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आला असून या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,गुजरात,मध्यप्रदेश व इतर राज्यातील सहा लाखाहून अधिक शेतकरी कनेक्ट आहेत.त्यांना विविध 20 ग्रुप अँडमीन मार्गदर्शन करतात त्यापैकी पाच कृषी विभागातील Ph.D.धारक आहेत.या ग्रुपच्या सदस्यांना युट्युब,फेसबुक,ट्विटर माध्यमातून मार्गदर्शन केले.आष्टा येथे विविध परिसंवाद,चर्चासत्र,शिवार भेट असे उपक्रम घेतले जातात.भारतातील विविध राज्यातील हजारो शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊन शेतीविषयक प्रबोधन आणि प्रशिक्षणाचा लाभ घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here