देवर्डे आंदोलन तीव्र करणार

0

आजरा :
देवर्डे गावठाणवाढ प्रश्न शासनाच्या  दिरंगाईमुळे भिजत पडला आहे. या प्रश्नाची निर्गत व्हावी यासाठी मागील ११ दिवस देवर्डे येथे गट नं. ३४० मध्ये ठिय्या आंदोलन सुरु आहे. यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून २४ रोजी चित्री धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन छेडले जाणार असून २५ पासून आजरा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती मुक्ती संघर्ष समितीचे संघटक संग्राम सावंत यांनी दिली.
देवर्डे येथील गट नं. ३४० गावठाण वाढीसाठी मंजूर असून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना तसा ताबडतोब आदेश द्यावा. गावठाणवाढ प्रक्रियेबाबत दप्तर दिरंगाई झालेली असून ती परिपूर्ण करून तत्काळ कायदेशीर व शास्त्रीयदृष्ट्या पूर्ण करावी. रेखांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगररचना व मूल्यनिर्धारण शाखेला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत यश विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.
मागण्यांबाबत प्रशासनाकडून सण २००८ ते २०१९ पर्यंत झालेली दप्तर दिरंगाई तसेच प्रशासनाकडून राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीत देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या ११ दिवसांपासून देवर्डे येथे गट नं. ३४० मध्ये आंदोलन सुरु आहे. वन्यप्राण्यांचा वावर आणि थंडीच्या कडाक्यातही आंदोलक दिवस – रात्र ठाण मांडून आहेत. तरीही शासन या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. यामुळे नाईलाजाने आम्हाला चित्रीच्या पाण्यात उतरून आंदोलन करावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर प्रमोद पाटील, केरबा बागडी, प्रभाकर कांबळे, मारुती कांबळे, बबलू शेख, राजेंद्र देशमुख, रामा कांबळे, सुरेश बागडी, पांडुरंग कांबळे, कोंडूबाई कांबळे, संगीत बुरुड, गैराबाई कांबळे, शकुंतला बागडी, सविता बागडी, संजय सोले संग्राम सावंत आदींच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here