जलसंपदा विभागाची विभागस्तर आढावा बैठक

0

राजू म्हस्के

मराठवाड्यात पाणी पुरवठ्याच्या आणि स्वच्छतेच्या योजना राबविण्यासाठी विभागाने सुमारे 1 हजार 434 केाटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीच्या माध्यमातून मार्च 2018 पर्यंत पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड आदी उपस्थित होते.पुढे बोलतांना श्री. लोणीकर म्हणाले की, मराठवाड्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यासाठी 464 कोटी, जलस्वराज्य टप्पा- 2 साठी 109 केाटी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी 94 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार सर्व कामे मार्च 2018 पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले.स्वच्छतेविषयी बोलतांना लोणीकर म्हणाले की, हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांचा पुढाकार गरजेचा आहे. मराठवाड्यात हागणदारीमुक्तीचे काम प्रगतीपथावर असून जालना जिल्हा आघाडीवर आहे. राज्यातील 29000 गांवे हागणदारीमुक्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शौचालयाचे बांधकाम झाले आहे. या शौचालयांचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. यासाठी प्रचार आणि प्रसार योग्य पध्दतीने होणे गरजेच आहे. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला मार्च 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करावयाचा आहे. शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्रात रू. 277 कोटीचे अनुदान तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यापैकी 120 कोटी मराठवाड्यात देण्यात येणार असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सागितले.विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर म्हणाले की, मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यात कामांना गती नाही अशा जिल्ह्यातील कामांचा पुढील आठवड्यात विशेष आढावा घेण्यात येईल आणि सर्व कामे मार्च 2018 पर्यंत कशा प्रकारे पूर्ण होतील यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here