दौलतसाठी तालुका संघ टेंडर भरणार

राजेश पाटील यांची माहिती : शिनोळी तेथे सेवा सोसायटीच्या चेअरमन, संचालक व गट सचिवांची बैठक

0

चंदगड :  चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने दौलत साखर कारखाना चालवायला घेण्याचे टेंडर तालुका संघामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. दौलत वाचविण्याच्या या प्रयत्नाला सर्वानी मनापासून साथ द्या, असे आवाहन चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेश पाटील यांनी व्यक्त केले. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि गट सचिवांच्या शिनोळी तेथे आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रास्ताविक बाळू चौगुले यांनी केले. राजेश पाटील आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, दौलतला गतवैभव प्राप्त व्हावे, ही स्व. नरसिंगराव पाटीलांची इच्छा पूर्ण करण्याबरोबरच गोरगरीब शेतकऱ्यांच्या उसाला योग्य वजन आणि योग्य भाव मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सर्वानी ठेवी द्याव्यात. सर्व ठेवी मुदतीअंती व्याजासह परत करण्यास आपण वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांनीही आपला संपूर्ण ऊस दौलतकडेच गाळपासाठी पाठवून सहकार्याची भूमिका घ्याची, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित चेअरमन आणि गटसचिवांनी दौलतीसाठी ठेवी देण्याचे आश्वासन दिले. शिनोळी येथील ईश्वर तुडयेकर या शेतकऱ्याने दौलतसाठी पाच टन मोफत ऊस देण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी सुरुते सोसायटीचे चेअरमन मल्लुदादा पाटील, शिवणगेचे चेअरमन गोविंद प्रभू पाटील, कुदनूरचे बी. पी. कोकितकर, वाळकुळीचे चेअरमन भीमराव चिमणे, जंगमहट्टीचे संभाजी पाटील, ढेकोळीचे गटसचिव धाकलू मेलगे, सदानंद मुरकुटे, सातू पाटील, बाबासाहेब शिरोलीकर, आबासो पाटील, तालुका संघाचे मॅनेजर एस. वाय. पाटील, तानाजी गडकरी, विनोद पाटील, अभयराव देसाई, गोविंद सावंत आदींनी मनोगत व्यक्त करून चंदगड तालुका संघाने टेंडर भरावे, त्यासाठी सहकार्याची भूमिका आम्ही घेऊ याची ग्वाही दिली. आभार पोमाणा पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here