कोल्हापूर – प्रशांत चुयेकर

पुरोगामी विचाराचा आदर्श घेत अनेक चळवळी उभ्या राहील्या. त्या – त्या समाजाचे नेतृत्व करत समाजाचा विकास केला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये भल्या भल्या सत्ताधा-यांना त्यांच्या मागे असणा-या कार्यकर्त्यांचा धसका घेतला होता. कार्यकर्त्यांचा जोरावर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून डॉ. आंबेडकर यांनी ऑल इंडिया शेडयूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून राजकीय पक्ष उभा केला. त्यांच्या हयातीनंतर मात्र दलित्तेर चळवळीत बोटावर मोजण्या इतक्या चळवळींनाच सत्तेत सहभाग घेता आला. भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, माजी राज्यपाल रा. सु. गवई, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे या प्रमुख नेत्यांनी कॉंग्रेसच्या काळात संसदेत आंबेडकरी विचारांचा एक वेगळा ठसा निर्माण केला. या चारही नेत्यांनी कॉंग्रेसबरोबर सहकार्य करत लोकसभेत सहभाग मिळवला होता. त्यानंतर मात्र, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कायम सत्तेत राहण्यासाठी शिवसेना – भाजपशी घरोबा केला. यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळाले.

बौद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी या चारही नेत्यांनी प्रयत्न केले. याचा फायदाही त्यांना काहीवेळा झाला. मात्र, पुरोगामी विचारांवर आधारित असणा-या इतर समाजातील चळवळीतील नेतृत्वाला सत्तेत वाटा मिळाला काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. धनगर समाजाचे प्रश्न पुढे घेउन आलेल्या महोदव जानकर यांना राज्यात पशुसंवर्धनमंत्रीपद मिळाले. आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व म्हणून रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपद मिळाले. साहित्यीक आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव यांना खासदारकी मिळाली. यासह शेतक-यांच्या चळवळीशी सबंधीत सदाभाउ खोत यांना राज्यातील कृषीराज्यमंत्रीपद मिळाले. मराठा समाजचे नेतृत्व म्हणून विनायक मेटे यांना आमदारकी मिळाली. आदी विविध समाजातील उदाहरणे देता येतील. मातंग समाजाचे प्रश्न पुढे घेउन आलेल्या दलित महासंघाला या महिन्यात पंचवीस वर्ष पुर्ण होत आहेत तरीही अण्णाभाउ साठे महामंडळाचे अध्यक्षपद वगळता सत्तेत वाटा मिळविताना अपयश आले आहे. अण्णाभाउ साठे महामंडळाचे अध्यक्षपदाचे पाच वर्ष पुर्ण न करताच ते पद काढून घेण्यात आले. यामुळे प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे अध्यक्ष असणारा ‘दलीत महासंघ’ पंचवीस वर्षे पुर्ण करतोय, पण लक्षात कोण घेतय? अशी अवस्था संघटनेची झाली आहे.

‘दलीत महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी विविध राजकीय पक्षांच्या वरीष्ठांना बोलवले जाते. संघटन किती आहे, मातंग समाज आपल्याच पाठीशी आहे, आम्हालाही सत्तेत वाटा द्या, अशी जाहीर मागणीही नेत्यांच्याकडे अध्यक्ष यांच्याकडून केली जाते. पण लक्षात कोण घेतय? अशीच अवस्था दलीत महासंघाची झाली आहे. मातंग समाजाची संघटना म्हणून दलीत महासंघाचा राज्यात नाव आहे. विविध जिल्हयात कार्यकर्ते असून दलीत, वंचितांच्यावर होणा-या अन्यायाविरोधात लढाही दिला जातो. इतकं असूनही कार्यकर्त्यांच्याबरोबर नेत्यांनाही कोण विचारात का घेत नाही? याचा विचारही वर्धापनदिनाच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. कारण इतर समाजाचे नेतृत्व कमी असूनही त्यांच्या नेतृत्वाला सत्तेत वाटा मिळतो, मग आरपीआयच्या पावलावर पाउल टाकणा-या या संघटनेला लक्षात कोण का घेत नाही, कॉंग्रेस, राष्ट्रवादी  कॉंग्रेससह भाजप शिवसेनेनेही दुर्लक्ष केले आहे. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा वर्धापनदिनादिवशी एक मेळावा घेतला म्हणजे सत्तेत वाटा मिळणार नाही, याची जाणीवही नेत्यांच्यासह कार्यकर्त्यांना असायला हवी. इतर पक्षांत सहभागी होउन मातंग समाजाच्या नेत्यांनी सत्ताही भोगली मात्र समाज विकसीत झाला नाही जातीच्या आधारावर त्यांनी स्वतःचा विकास केला समाजाकडे दुर्लक्ष झाले.

 

एकनाथ आव्हाड, गणपत भिसे, आर.के. त्रिभूवन, युवराज पोवार, रमेष राक्षे, प्रा. सुकुमार कांबळे, प्रा. डॉ. शरद गायकवाड, प्रा. धनंजय साठे, प्रा. अमोल महापुरे, प्रा. प्रकाश नाईक, डॉ .माधुरी चौगुले, अवंती मीरा नंदू यांच्यासह  समाजातील गुणंवत अणि निपक्षवादी नेत्यांचा आदर्श घेत मातंग समाजातील तरुणांनी एकत्र येउन एक मजबूत फळी तयार करायला हवी, जेणेकरुन सत्तेमधील कोणताही पक्ष या लोकांना नाकारणार नाही सर्व समाजाच्या इतर घटकांबरोबर मातंग समाजातील नेतृत्वाला प्रत्येक ठिकाणी मत मांडण्याचा अधिकार मिळेल, अन्यथा चारी तोंडाला चार दिशा असल्या की आतापर्यंत काही मिळाले नाहीच, भविष्यातही काही मिळणार नाही एवढं मात्र नक्की. दलित महासंघाच्या वर्धापनादिनानिमित प्रा. सकटे यांनीही समाजाच्या विकासासाठी सर्व मातंग समाजातील विचारवंताना एकत्र आणण्यासाठी नव्याने मोट बांधावी. शिव, शाहु, फूले, आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेवर आधारित भविष्याची मांडणी करावी तरच या समाजालाही सत्ताधारी पक्ष लक्षात घेणार आहे. अन्यथा एक महामंडळ, आणि निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या अमिषाला बळी पडल्यास समाजाचा कधीही विकास होणार नाही, यासाठी ‘स्व’ पेक्षा ‘समाजा’चा विकास कसा होईल याकडे लक्ष दिल्यास इतिहास या संघटनेची दखल घेउन गौरव केल्याशिवाय राहणार नाही.

 

मातंग समाजातील शिक्षणाचे प्रमाण म्हणावे तसे वाढत नाही याबाबत दलित महासंघाच्या आणि मातंग समाजाच्या अभ्यास असणा-या प्राध्यापकांना विचारले त्यावर ते म्हणाले, मातंग समाजाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेउन पुढे जायला सांगितले तर मात्र त्यांच्या विकास व्हायला वेळ लागणार नाही. बौद्ध समाजात कोणतीही आरपीआय पोहचली नसली तरी निवळ बाबासाहेब या नावावर ती मुले शिकतात. विविध ठिकाणी यश मिळवितात तसा आदर्श मातंग समाजातील युवक, युवतींनी घेतल्यास बौद्धांच्याबरोबर मातंग समाजाचाही विकास होईल. नेतेगिरीसाठी बौद्धांच्याबरोबर मातंग समाज नको, असा सुरही मातंग समाजाच्या नेत्यांमधून ऐकायला मिळत असतो, म्हारांचा धम्म कशाला असा गैरसमजातून त्यांच्यावर टिका केल्यामुळे हा समाज बौद्धांच्या तुलनेत शिकायला कमी आहे. आता मातंग समाजातील नेत्याच्या बुरसट विचारसरणीला बाजूला ठेवत बाबासाहेब यांचा आदर्श घेत मातंग समाजातील मुले शिकत आहेत, आपला विकास करुन घेत आहे.

निवळ राजकारणासाठी मातंग समाजाला चुकीच्या दिशेने नेणा-या नेत्यांनीही आता विचार करण्याची वेळ आली आहे, समाज सुधारला तर आपली नेतेगिरी आहे, अन्यथा चळवळ सोडून सत्तेची स्वप्ने रंगविणा-या नेत्यांचा सदाभाउ झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार नरेंद्र जाधव, कृषीमंत्री सदाभाउ खोत, पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर, आमदार विनायक मेटकर यांच्यापासून त्यांचा समाजही दुर जात आहे. याची दखल घेउन पुढची दिशा दलित महासंघासह मातंग समाजातील नेत्यांनी ठरवली तर ते चिरकाल टिकणारे आहेत. अन्यथा ज्यांनी डोक्यावर घेतले तेच डोक्यावर खाली पाडायला मागे बघत नाही, याची दखल घेतलेली बरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here