डहाणू डम्पिंग ग्राऊंडला भ्रष्टाचाराची दुर्गंधी

संगीता कडू यांची कोर्टात याचिका

0

 

डहाणू नगरपरिषदेत डम्पिंग ग्राऊंडबाबत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्यामध्ये तत्कालीन मुख्याधिकार नगरपरिषदेच्या संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, यांनी संगनमताने हा कचरा घोटाळा केल्याची तक्रार डहाणूतील सामाजिक कार्यकर्त्या संगीता कडू यांनी केली आहे. नगरपरिषद प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष झाल्याने कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्याने डहाणूत मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली आहे. त्यामध्ये नगरपरिषदेचे एक माजी नगरसेवक यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीची खरेदी नगर परिषदेने डम्पिंग ग्राऊंडसाठी केली होती.

खरेदी केलेल्या जागेचे संपादन करून तेथे डम्पिंग ग्राऊंड होणे आवश्यक होते. परंतु तेथील ग्रामस्थांचा विरोध असल्याचे कारण सांगत नगरपरिषदेने येथे डम्पिंग ग्राऊंडचा प्रस्ताव बासनात गुंडाळला व ग्रामपंचायत आगवन येथील जागेत डम्पिंग ग्राऊंड सुरू करण्याचा प्रस्ताव संमत केला. परंतु येथील जागेचा विनियोग न करताच ती जागा तशीच सोडून देण्यात आली. त्यानंतर  लोणीपाडा येथील जागेत कचरा टाकण्याचे सुरू केले. तेथेही अनियमितपणे डम्पिंग ग्राऊंड करण्याचा घाट नगरपरिषदेने रचल्याचे दिसून येते . येथील रहिवाशांनीही दुर्गंधीमुळे यास विरोध केला असून याबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.

पालघरचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशापत्राची समज देऊन सुद्धा डहाणू नगरपरिषदेमध्ये डम्पिंग ग्राऊंड वाटपादरम्यान भ्रष्टाचार चौकशी न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला,असे संगीता कडू यांनी याचिकेत म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी लोणीपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडला भेट देऊन पर्यावरण नुकसानबाबत रिपोर्ट दाखल करण्याचे कोर्टाने सुनावले आहे . भारत सरकारच्या नगररचना घनकचरा व्यवस्थापन नियमावली २००० च्या अंमलबजावणी चा रिपोर्ट न्यायालयाने सादर करण्याचे पिटीशनमध्ये निर्देशित केले आहे. याबाबत ना. वसंत नाईक व आर. आय. चगला यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू असून ऍड.रामदास पाटील हे याचिकाकर्ते कडू यांचा पक्ष मांडत आहेत.

त्यामुळे डम्पिंग ग्राउंडमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा डहाणूत रंगली असून या कचरा घोटाळ्यातील आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार असल्याने वातावरण तापले आहे. नगरपरिषदेत नुकतेच झालेले सत्तांतर याविषयी काय भूमिका बजावेल याबद्दल नाना तर्क काढले जात आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here