सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर सिक्युरिटी प्रकल्प कार्यान्वित – बाळसिंग राजपूत

0

सायबर गुन्हेगारीचे वाढते स्वरूप, सोशल मीडियाचा वापर तसेच ॲप अथवा सॉफ्टवेअर डाउनलोड करताना घ्यावयाची खबरदारी, फेक न्युज, सोशल मीडिया, सिक्युरिटी आणि प्रायव्हसी यातील फरक, सायबर सुरक्षेकरिता शासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना, सायबर लॅबचे कामकाज आदी विषयांची सविस्तर माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांनी दिली आहे.

प्रश्न- सायबर म्हणजे नेमके काय?

इंटरनेट आणि संगणकाच्या माध्यमातून जे जाळं निर्माण झालं आहे, त्यामध्ये आपली व्हर्च्युअल ओळख, प्रत्यक्ष ओळख, संगणक आणि त्याचं जाळं या घटकांना आपण सायबर म्हणू शकतो. सायबर ही एक व्यापक व्याख्या आहे, यात इंटरनेट संबंधित सगळे संगणकीय व्यवहार येतात.

प्रश्न- सायबर गुन्हेगारी म्हणजे काय?

सायबर गुन्हेगारीबद्दल जाणून घेण्यापूर्वी सायबर विश्वाचा धोका म्हणजे काय आणि धोका निर्माण करणारे घटक कोणते आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. आधी हॅकिंग करणाऱ्या कॉलेजच्या मुलांना स्क्रिप्ट किड्स म्हणायचे. आता सायबर गुन्हेगारी करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये नेशन स्टेट आहेत, म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या विरोधात कुरघोडी करणे. यामध्ये एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या विरोधात कुरघोडी करण्यासाठी नेमलेल्या निनावी संस्था आहेत ज्या पैश्यासाठी किंवा इतर कारणांसाठी काम करतात आणि गुन्हेगार आहेत. कोणताही सायबर धोका हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असतो, एखाद्या व्यावसायिक संगठनाच्या एकूण आर्थिक व्यवहाराला धोका निर्माण होतो, सायबर गुन्हेगारी, म्हणजे संगणक आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची आर्थिक किवा मानसिक फसवणूक करणे, स्त्रियांचे छळ करणे आदी.

प्रश्न- तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आता प्रत्येक हातामध्ये सायबर धोका निर्माण झाला आहे असे म्हणता येईल का?

भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २७ ते ३० टक्के लोकांजवळ मोबाईल आहेत. प्रत्येकाकडे उपलब्ध असलेल्या मोबाईलचा उपयोग इंटरनेटद्वारे बँकांचे आर्थिक व्यवहार, तिकीट बुकिंग, सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केले जाते. मोबाईल शिवाय ब्रॉडबँड आणि इतर मार्गाने इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणजे प्रत्येक माणूस हा सायबर गुन्ह्याचा लक्ष्य आहे आणि प्रत्येक माणूस हा सायबर धोका निर्माण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये कुठलेही बंधन नाही. कुठल्याही देशाचा कोणताही व्यक्ती दुसऱ्या देशाच्या कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करू शकतो. तिसरी महत्वाची बाब म्हणजे अनामिकत्व. यामध्ये फसवणूक कोण करतो आहे याची माहिती काढणे अशक्यप्राय असते, ओळख लपवली जाऊ शकते. दोन व्यक्तीमध्ये काय संवाद झाले याची माहिती तिसऱ्या व्यक्तीला होत नाही. यामुळे आता प्रत्येकच व्यक्तीला सायबर धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक गुन्हेगाराला ते पकडले जाऊ शकत नाही याची खात्री आहे आणि यात खर्च पण कमी आहे म्हणून या गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे.

प्रश्न- मोबाईलवर विविध ॲप्लिकेशन डाऊनलोड केले जातात यामध्ये काही धोका दडलेला असू शकतो का?

साधारणत: प्रत्येक लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये विविध अॅप्लिकेशन डाऊनलोड केले जातात जे कामाचे असतात. पण ही अॅप्लिकेशन्स कोणी निर्माण केली आहेत, अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना स्वत:चा नंबर, फोटो इत्यादी माहिती त्या अॅप्लिकेशनला जाते ती कोणाला मिळते, त्या अॅप्लिकेशनचे सर्व्हर कोणते आहेत याची माहिती कोणाला नसते. हे अॅप्लिकेशन नि:शुल्क असतात असा समज आहे जो सर्वथा चुकीचा आहे. कारण अशा प्रकारची सेवा देणाऱ्या व्यवसाय संस्था ग्राहकांची खाजगी माहिती जसे फोन नंबर, ई-मेल आय.डी. आदी दुसऱ्या व्यावसायिक संस्थांना विकतात. असा व्यवसाय करणाऱ्या कॉर्पोरेट संस्था ज्यांची माहिती शासनाला असते ते सुरक्षित असतात, पण नवीन संस्था ज्यांची शासनाला काहीच माहिती नाही, ज्या दुसर्या राष्ट्रातील संस्था असतात त्या धोकादायक असतात.

प्रश्न- भारतीय सायबर सिक्युरीटी कार्यशाळेमध्ये आपण सहभागी झालात. त्या अनुभवाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.

सायबर गुन्हे आणि सायबर सिक्युरीटी या संदर्भात वेगवेगळी राज्य कशाप्रकारे काम करीत आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर एकत्रितरित्या कार्य करायचे असल्यास कशाप्रकारची यंत्रणा निर्माण करावी लागेल या संदर्भात भारतीय सायबर सिक्युरीटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या ३० टक्के लोकांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, पुढे १०० टक्के लोकांकडे सुविधा उपलब्ध असेल. अशावेळी सायबर सिक्युरिटीचा प्रश्न हा वाढत जाणार आहे आणि त्यानुसार अधिक सक्षम सुरक्षा यंत्रणा निर्माण करणे काळाची गरज आहे. देशामध्ये सायबर पोलीस स्टेशन, सायबर लॅब, सायबर शैक्षणिक संस्था, मानव संसाधनाची क्षमता, अभ्यासक्रम कशाप्रकारचे असायला हवेत या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रश्न- सायबर गुन्ह्याची व्याप्ती आणि सुरक्षिततेसंदर्भात एक मोठी यंत्रणा निर्माण करण्याचे आव्हान आहे असे म्हणता येईल का?

एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्यांनी भारतीय सायबर सिक्युरिटी कार्यशाळेत, सायबर सिक्युरिटी संदर्भात प्रात्यक्षिक दाखविले. महाराष्ट्राने विविध उपक्रम राबविले आहेत जसे की महाराष्ट्र सायबर सिक्युरीटी प्रकल्प. या अंतर्गत देशामध्ये प्रथमच एकूण ४४ सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एकूण ४७ साधन सुसज्जित सायबर लॅबचे निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्राने वेगवेगळ्या सुरक्षा संस्थांमार्फत सायबर सिक्युरिटी संदर्भात जनजागृती केली आहे. असे उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

प्रश्न- कोणतेही अॅप डाऊनलोड करताना किंवा वेबसाईट बघताना काळजी घेणे कितपत महत्वाचे आहे?

गुगल किवा जीमेल सर्विस वापरताना त्यातील सेवा करारावर असे लिहिले आहे की, त्यात जी काही माहिती भरली जाते ती वापरण्याचे गुगलकडे अधिकार आहेत. प्रत्येक वेबसाईट आणि अॅपवर ट्रॅकर असतात. कोणत्या साईट्स जास्त बघितल्या जातात, कोणत्या साईटच्या कोणत्या विभागाला जास्त पसंती मिळत आहे याची नोंद ट्रॅकर घेत असतात आणि ही माहिती जाहिरात कंपन्यांना विकली जाते.या ट्रॅकर्सची माहिती काढली जाऊ शकते म्हणून एक नवीन यंत्रणा निर्माण करण्यात आली, त्यामध्ये अल्ट्रासोनिक विकिरणांच्या सहाय्याने ॲप्लिकेशन वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून जाहिरात कंपन्यांना पुरविली जाते. गुगलवर आपले फोटो, आपल्या मॅसेजमधील मजकूर, आपण कुठे जात आहोत, आपली आवड काय आहे ही सगळी माहिती जाहिरात विभागाला विकली जाते. या माहितीनुसार कोणत्या प्रकारची जाहिरात दाखविली जावी हे ठरवले जाते. यानुसार काळजी घेणे महत्वाचे आहे.

प्रश्न- गुगल वर भरलेली माहिती संपूर्णपणे नष्ट केली जाऊ शकते का?

गुगल वर भरलेली माहिती मोबाईल वरून नष्ट करता येईल पण गुगल वरून संपूर्णपणे नष्ट केली जाऊ शकत नाही. एका क्लाऊडवरची माहिती नष्ट केली तरी इतर ठिकाणी ती माहिती पुरवण्यात आली असेल तर ती नष्ट केली जाऊ शकत नाही. महत्वाचे प्रमाणपत्र ई स्वरुपात जीमेल किवा गुगलवर ठेवणे असुरक्षित आहे.

प्रश्न- मोबाईल फोनचा वापर विविध गेम खेळण्यासाठी केला जातो या संदर्भात काय सांगाल?

आधी मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे ज्यामुळे मन, बुद्धी आणि शरीर निरोगी राहायचे. लहान मुले जे बघतात त्याचप्रकारची त्यांची वागणूक होते. मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी वयोगटाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ निर्माण केले जातात. मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि युद्ध दाखविणारे गेम तयार केले जातात. यात मुले गुंतून जातात आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर याचे दुष्परिणाम होतात. ब्लुव्हेल गेम हा अशाप्रकारच्या गेमचे उदाहरण आहे. यात मुलांची मानसिकता, नैराश्य याचा अभ्यास करून मुलांना आव्हान दिले जायचे आणि गेम खेळण्यास प्रवृत्त केले जायचे. एकमेकांच्या ओळखीने या गेमचे जाळ पसरविण्यात आले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. विदेशात याप्रकारचे गेम निर्माण करणारी मोठी यंत्रणा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here