राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घोडाझरी या नवीन अभयारण्याच्या निर्मितीस मान्यता

0

वन्यजीव मंडळाच्या बैठकीत विविध प्रस्तावांना मान्यता

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील घोडाझरीया नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली.

या बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सर्वश्री बंटी भांगडिया, प्रभुदास भिलावेकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ब्रम्हपुरी वन विभागातील एकूण १५९.५८३२ चौ.कि.मी क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ट होणार असून या क्षेत्रामध्ये वन विभागातील नागभीड, तळोधी व चिमूर वन परिक्षेत्रातील पहाडी जमिनीचे व घोडाझरी तलावालगतचे वनक्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान- धबधबा असून प्रस्तावित अभयारण्याच्या पूर्व भागास नागपूर ते चंद्रपूर रोड आहे. या वनक्षेत्रात पहाडी भाग मोठ्या प्रमाणात असून वन्यजीवांच्या अधिवासासाठी हा भाग अतिशय उपयुक्त आहे. या वनक्षेत्रात १० ते १५ वाघ, २३ बिबटे यासह रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, कोल्हे, रानडुक्कर, माकड आणि ससे यासारखे वन्यजीव वास्तव्यास आहेत. या अभयारण्याच्या निर्मितीमुळे आजुबाजूच्या ५९ गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल.

आजच्या बैठकीत राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य क्षेत्रातील तसेच या क्षेत्राबाहेरील विकास कामांना अटींच्या अधीन राहून तसेच करावयाच्या उपाययोजनांची दखल घेत मंजुरी देण्यात आली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीच्या सीमेवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८ चे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या प्रस्तावाचा यात समावेश आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणारा टिकूजिनीवाडी ठाणे याला बोरिवली, मुंबई येथे जोडणाऱ्या प्रस्तावित महामार्गासाठी बोगद्यांचे सर्वेक्षण करण्यासही आज मान्यता देण्यात आली. या सर्वेक्षणानंतर एकूण प्राप्त परिणामांचा अभ्यास करूनच प्रस्तावाचा पुढे विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

संरक्षित क्षेत्राच्या बाहेरील प्रस्तावित विकास कामांच्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे च्या पॅकेज-५, ठाणे जिल्ह्याबाबतच्या प्रस्तावाचा ही समावेश होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई नागपूर एक्सप्रेस वे हा पूर्ण महामार्ग जागतिक दर्जाचा करण्यात येत असून तो कार्बन न्युट्रलकरण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. त्यामुळे हे काम करत असतांना वन्यजीव संरक्षणाच्या सर्व उपाययोजनांचा विचार करूनच हे काम केले जाणार आहे.

बैठकीत तेजस ठाकरे यांना संशोधनाच्या कामासाठी गोड्या पाण्यातील खेकड्यांचे जिवंत नमुने गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here