घनकचरा व्यवस्थापनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करा – हरिभाऊ बागडे

0

राजू म्हस्के

औरंगाबाद – शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेच्या वार्डांसोबतच नारेगाव येथील कचरा डेपोच्या समस्येवर लवकर तोडगा काढावा. शहरात  घनकचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प उभारुन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमासह प्रकल्प अहवाल तातडीने तयार करावा, अशा सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. बागडे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाबाबत आयोजित  बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या बैठकीस महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिकचे आयुक्त डी.एम.मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, नवी मुंबई महानगर पालिकेचे शहर अभियंता मोहन डागावकर, मनपाचे पदाधिकारी गजानन बारवाल, विकास जैन, राजू शिंदे, शहर अभियंता श्री. पानझडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. बागडे म्हणाले, नारेगाव येथील कचरा डेपोसंदर्भात स्थानिक नागरिकांच्या असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नवी मुंबईच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करुन प्रकल्प अहवाल तयार करावा. प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. नवी मुंबई तसेच इतर शहरातील महानगरपालिकांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा तांत्रिक अभ्यास करुन हा प्रकल्प उभारावा, असे सांगून शहरात कचरा डेपोसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असेही श्री. बागडे म्हणाले.

शहरात जमा होणारा कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावण्यासाठी वॉर्डात कचऱ्यापासून खत निर्मिती करणारी यंत्रे लावण्याचा विचार व्हावा. वॉर्डात जमा होणारा कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केल्यास कचऱ्याची जलदगतीने विल्हेवाट लावण्यास मदत होईल. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही श्री. बागडे यांनी यावेळी केले.

महापौर श्री. घोडेले म्हणाले, इतर शहरा  व राज्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी अभ्यास करुन औरंगाबाद शहराची गरज लक्षात घेऊन परिपूर्ण प्रकल्पाचा आराखडा तयार करावा.

श्री. मुगळीकर यांनी शहरात जागा निश्चितीनंतर उभारण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे संगणकीय सादरीकरण केले. नवीन मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता मोहन डागावकर यांनी सादरीकरणाद्वारे तुर्भे येथे उभारलेल्या कचरा डेपो व त्यानंतर तेथे तयार केलेल्या हिरवळीच्या मैदानाबाबत माहिती दिली. या बैठकीस महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते. महापौर श्री. घोडेले यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here