राज्यातील एक कोटी 27 लाख शेतकऱ्यांना येत्या गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सातबारा देणार – चंद्रकांत पाटील

आतापर्यंत राज्यातील 30 हजार गावाचं काम पूर्ण

0

कोल्हापूर : राज्यातील 43 हजार गावातील एक कोटी 27 लाख शेतकरी खातेदारांना येत्या गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सातबारा देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.

प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिन समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
सातबारा ऑनलाईन देण्याच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून आतापर्यंत राज्यातील 30 हजार गावाचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित 13 हजार गावांचे सात बारा ऑनलाईनचे काम येत्या गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून त्या दृष्टीने महसूल यंत्रणा गतिमान केल्याचे सांगून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात 5 हजार तलाठी सज्जे आणि 500 सर्कल वाढविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून 500 सज्यांच्या कार्यालयांचे बांधकाम सुरु केले आहे. याबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याच्या दृष्टीने 500 स्क्वेअर फूट शासकीय जागेवरील अतिक्रम अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून गावांचे गावठाण 200 मीटरने वाढविण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षात रस्त्याचं जाळं निर्माण करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून येत्या तीन वर्षात राज्यातील 38 हजार किलो मीटरचे रस्ते 3 पदरी, 4 पदरी आणि 6 पदरी करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन वर्षात 22 हजार किलो मीटरचे रस्ते हाती घेतले असून येत्या 2 वर्षात या रस्त्यांचे 4 पदरीकरण पूर्ण केले जाईल. गुणवत्तापूर्ण व राष्ट्रीय दर्जाचे रस्ते उभारण्यासाठी हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल तयार करण्यात आले असून याद्वारे 10 हजार किलो मीटर रस्त्यांचे 3 पदरीकरणाचे काम केले जाईल. 6 हजार 500 किलो मीटरचे 6 पदरी रस्ते करण्यात येणार आहेत. कुठलाही रस्ता यापुढे 10 वर्षे खराब होणार नाही याची दक्षता घेतली जात असून त्याच्या दुरुस्तीचे काम निघाल्यास ते पूर्ण करणे संबंधितांना बंधनकारक केले आहे. तसेच राज्याचं ज्येष्ठ नागरीक धोरण तयार करण्यात येत असून ते लवकरच जाहीर केले जाईल यामध्ये ज्येष्ठ नागरीकांची वयाची अट 65 वरुन 60 करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here