हरणाच्या शिंगासह चंदनचोर जेरबंद

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज तालुक्यातील महागाव ते वैरागवाडी रोडवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गडहिंग्लज पोलिसांनी पाळत ठेवून, तीन चंदन चोरांना पकडले. त्यांच्याकडून हरणाची दोन शिंगेही जप्‍त करण्यात आली आहेत. गडहिंग्लज पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर, वनविभागानेही चौकशी सुरू केली असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुनील मारुती शिंदे (वय 25, रा. मेटाचा मार्ग, गडहिंग्लज), राजू संजय मोरे (21, रा. मेटाचा मार्ग, गडहिंग्लज) व राजेंद्र परशराम चंदनवाले (47, रा. आमराई गल्‍ली, आजरा) यांचा समावेश आहे. गडहिंग्लजचे पोलिस उपनिरीक्षक विश्‍वास कुरणे यांना खबर्‍याकडून वैरागवाडी रोडवर काही जण हरणाची शिंगे व चंदनाचा सौदा करणार असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कुरणे यांनी सहायक फौजदार सर्जेराव झुरळे, हवालदार तानाजी विचारे, नामदेव कोळी, दोरूगडे यांच्यासह चालक मेटकर यांना सोबत घेऊन खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीचे ठिकाण गाठले.

रात्री साडेआठच्या सुमारास वैरागवाडी येथील त्या जागेवर दुचाकीवरून तिघे जण आले. ते त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताच, या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 60 किलो चंदनाचा केत व पूड सापडली. याशिवाय हरणाची दोन शिंगेही सापडली. पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, वनविभागाच्या पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या समक्ष पंचनामा केल्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली. या आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 50 हजार रुपये आहे. तिघा आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here