‘चॅम्पियन ऑफ चेंज’ भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून गौरव

0

जयश्री भिसे

मुंबई- भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ या पुरस्कारासाठी महावितरण कंपनीची निवड करण्यात आली आहे.  हा पुरस्कार भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भारत सरकारचे वित्तमंत्री मा. ना.श्री. अरुण जेटली यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकताच देण्यात आला.

विविध राज्यांतील केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारितील कंपन्या, संस्था, राज्ये यांच्या सहभाग आणि मानांकन लक्षात घेऊन ही निवड ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ या पुरस्कारासाठी करण्यात येत असते.  महावितरणच्या प्रशिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रातील सन 2016-17 ची कामगिरी लक्षात घेऊन मानांकन श्रेणीतून महावितरणची निवड झालेली आहे.

सार्वजनिक उपक्रमातील संस्थांनी जास्तीत जास्त शिकाऊ उमेदवारांना दिलेली नियुक्ती,  प्रशिक्षण व गुणवत्तेची कामगिरी लक्षात घेऊन ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सन 2016-17 ची महावितरणची कामगिरी लक्षात घेऊन मानांकन मिळाल्यावर ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कारासाठी महावितरणची निवड करण्यात आली. महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2016-17 मध्ये महावितरणने सुमारे 3,562 शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षित केलेले आहे.

‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम नवी दिल्ली येथे दि. 09 नोव्हेंबर 2017 रोजी   मा. ना. श्री. अरुण जेटली, वित्तमंत्री, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. या कार्यक्रमास पेट्रोलियम व कौशल्य विकास राज्यमंत्री मा. ना. श्री. धर्मेद्र प्रधान आणि जपानी राजदूत श्री. हेनजी हिरामातसु इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

महावितरणच्या नाशिक एकलहरे येथील प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राच्या मुख्य महाव्यवस्थापक, श्रीमती रंजना पगारे, यांनी ‘चॅम्पीयन ऑफ चेंज’  हा पुरस्कार नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शानदार सोहळ्यात स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here