ठाण्यात भाजप सरकारची पोलिसांच्या मदतीने दडपशाही – आनंद परांजपे

रोजगार निर्मितीमध्ये भाजप सरकार सपशेल अपयशी

0

प्रतिनिधी :  पूनम पोळ

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोजगार आणि स्वयंरोजगार यामधील फरकच समजत नसल्याने त्यांनी उच्चशिक्षित मुलांनी भजी विकावेत, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. रोजगार निर्मितीमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही जे फलक लावले आहेत. ते फलक सरकारने दडपशाही करुन पोलिसांच्या मदतीने हटवले आहेत. याचाच अर्थ, सरकार आम्हाला घाबरले असून दडपशाहीसाठी पोलिसांचा आश्रय घेत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.

मोदी यांनी पकोडे विकणे हा रोजगारच असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानावर अनेक स्तरातून टीका होत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने ’पकोडा अर्थशास्त्र‘ अशा आशयाचे फलक ठाणे शहरात लावले आहेत. हे फलक लावण्यासाठीची परवानगी देखील घेण्यात आलेली असताना हे फलक अचानक काढून टाकण्याचे सत्र ठाणे पोलिसांनी सुरु केले आहे. गुरुवारी शहराच्या अनेक भागात लावण्यात आलेले हे फलक काढण्यात आले. त्याबद्दल आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही आमचा विरोध व्यक्त केला तर या भाजप सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या देशात, या राज्यात, या शहरात आता अघोषित आणीबाणीच सुरु असल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

पकोडा (भजी) विकणे हा रोजगार असूच कसा शकतो? उच्च शिक्षण घेतल्यानंतरही हातगाडी लावून जर भजी तळायचे असतील तर शिक्षण घ्यायचेच कशाला, असा सवाल उपस्थित करुन हे भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्याचा जाब विचारणारे पोस्टर आम्ही लावले होते. ते जबरदस्तीने काढून भाजप सरकारने आपण डरपोक असल्याचेच दाखवून दिले आहे, अशी टीकाही त्यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here