बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे: ऍड. विराज गडग

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-आदिवासी जननायक बिरसा मुंडा व क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न ने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी डहाणूतील नामवंत वकील ऍड. विराज गडग यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे पत्र भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री पाठवले आहे.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजातील बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांचे कार्य देशवासियांना प्रेरणादायी आहे. मुंडा यांनी ब्रिटिश राजवट उलथून टाकून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे संघटन सुरु केले. तसेच जुलमी जमीनदार व सावकार यांच्याविरुद्ध बंड पुकारून जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. इंग्रजांनी त्यांना कारागृहात डांबून ठेवले व ९ जून १९०० रोजी त्यांना विषप्रयोग करून मारले.

राघोजी भांगरे यांनी इंग्रजांच्या नोकरीचा त्याग १८३८ रोजी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. शेतकरी, मजूर आणि बहुजन समाजाला एकत्र करुन त्यांनी महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध आंदोलने केली. २ मे १८४८ रोजी इंग्रजांनी ठाण्याचा कारागृहात त्यांना फासावर चढविले. या दोन्ही आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिले. त्यामुळे त्यांच्या देशकार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्नाने गौरविण्यात यावे, अशी मागणी गडग यांनी केली आहे.

दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयात बिरसा मुंडा यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करण्याच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. तसेच, ठाणे कारागृहात राघोजी भांगरे यांना फाशी देण्यात आली होती.त्यामुळे या कारागृहाचे राघोजी भांगरे मध्यवर्ती कारागृहाचे असे नामकरण करावे, असे गडग यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here