गडहिंग्लज, आजरासह चंदगड तालुक्याच्या भूजल पातळीत वाढ

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

सध्या सर्वत्र पाणी वाचवा यासाठी सामाजिक अभियान राबविले जात आहेत. अनेक उपक्रमाव्दारे पाण्याचे महत्त्व सांगितले जाते. यातच घटलेली पाणी पातळी हा चिंतेचा विषय ठरत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा तसेच चंदगडसह नऊ तालुक्यात भूजल पातळीत वाढ झाली आहे. तर तीन तालुक्यांच्या भूजल पातळित घट जाणवली आहे. भूजल पातळी कमी झालेल्या तालुक्यात सर्वाधिक पर्जन्य वृष्टी आसणार्‍या गगनबावडा तालुक्याचा समावेश आहे.

मुळातच कोल्हापूर जिल्ह्याच्या सरासरी भूजल पातळीत यंदा वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या भूजल सर्व्हेनुसार गेल्या पाच वर्षांच्या भूजल पातळीच्या तुलनेत यंदा ०.१७ मीटरने वाढ झाली आहे.

भुजल पातळीबाबत राज्यात अनेक जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती असली, तरी कोल्हापूर जिल्हा तसेच कोकणात समाधानकारक स्थिती आहे.

महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागातर्फे जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीचा सर्व्हे करण्यात आला. यानुसार सर्वच १२ तालुक्यांतील ९९ विहिरींत भूजल पातळीबद्दलचे निरीक्षण नोंदविण्यात आले. या निरीक्षणानुसार १२ तालुक्यांपैकी तीन तालुक्यांतील भूजल पातळीत काहीशी घट झाली आहे. दुसरीकडे आठ तालुक्यांतील भूजल पातळी मात्र उंचावली आहे.

चांगले पर्जन्यमान, जलसंधारणाची झालेली कामे, कृत्रिम पुनर्भरण यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. २०१४ ते २०१८ या पाच वर्षांच्या कालवधीत जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी ३.८३ मीटर इतकी आहे. २०१९ सालात ३.६७ मीटर इतकी भूजलपातळी राहिली आहे. म्हणजे जिल्ह्याच्या सरासरी भूजल पातळीत यंदा ०.१७ मीटरने वाढ झाली आहे. तथापि, गगनबावडा तालुक्यात उणे ०.११ मीटर, पन्हाळा तालुक्यात उणे ०.०१ मीटर, शिरोळ तालुक्यात उणे ०.२४ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.

करवीर तालुक्याच्या भूजल पातळीत ०.७४ मीटरने म्हणजे सर्वाधिक वाढ झाली आहे. आजरा तालुक्यातील भूजल पातळीत ०.१९ मीटर, भुदरगड तालुक्यात ०.१३ मीटर, चंदगड तालुक्यात ०.११ मीटर, गडहिंग्लजमध्ये ०.२६ मीटर, हातकणंगले तालुक्याच्या भूजल पातळीत ०.२७ मीटर, कागल तालुक्याच्या भूजल पातळीत ०.५ मीटरने वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्यात ०.२१ मीटर, शाहूवाडी तालुक्यात ०.०३ मीटरने वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here