घारेगावच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार –जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

राजू म्हस्के

औरंगाबाद : पैठण तालुका जगप्रसिध्द आहे. ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण  अशा या तालुक्यातील  गावांचा कायापालट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकास साधावा. घारेगावाच्या विकासाला प्राधान्य  देण्यात येणार असून सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.

             जलयुक्त शिवार अभियांनातर्गत घारेगावच्या सुखना नदी खोलीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी श्री. राम बोलत होते. यावेळी आमदार संदिपान भूमरे, श्री. विठ्ठल लहाने, उपविभागीय अधिकारी सुभाष जाधव, तहसीलदार महेश सावंतसतीश सोनी आदींसह अधिकारी, कर्मचारी  यांची उपस्थिती होती.

             जिल्हाधिकारी राम म्हणाले, घारेगावातील रहिवाशांचे पाण्यामुळे नुकसान झाले. बागायती शेतीतही कोरडवाहू पिके घेऊन शेतकरी उदरनिर्वाह करतो आहे. परंतु पूर्वीसारखीच बागायती शेती याठिकाणी पुन्हा पिकविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून विकासकामे करण्यावर प्रशासनाचा भर असेल. यासाठी विधानसभा  सदस्य, जिल्हा विकास नियोजन निधी मधूनही विकास करण्याला प्राधान्य असेल. त्याचबरोबर सुखना नदीच्या खोलीकरणासाठी आवश्यक ती सर्व साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल. या खोलीकरणामुळे आजूबाजूंच्या सहा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी मदतच होणार आहे. या कामाबरोबरच उपविभागीय  अधिकारी आणि तहसीलदार यांनी  नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविण्याबाबत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा. हा प्रकल्प तडीस नेण्याचा संकल्पही पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.   घारेगावात येण्यासाठी वाहनांना येणाऱ्या अडथळ्यांबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. कौडगाव प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही तत्काळ मार्गी लावण्यास प्राधान्य असेल, असे श्री. राम म्हणाले.

              आमदार भूमरे यांनी सुखना नदी खोलीकरणाचे महत्त्‌व सांगितले. नदीचे 600 फुट रुंद आणि 12 कि.मी. लांब खोलीकरण करण्यात येणार आहे. या खोलीकरणामुळे आजूबाजूच्या गावाचा पाणीप्रशन मार्गी लागेल. पूर्वीप्रमाणेच बागायती शेती येथील शेतकरी करु लागतील, असा विश्वासही श्री. भूमरे यांनी व्यक्त केला.  श्री. लहाने यांनीही यावेळी विचार मांडले. सुरुवातीला खोलीकरण कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राम यांच्याहस्ते झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान थोरे यांनी  करुन आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here