राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर काँग्रेस आमदाराचे शिवसेना उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन

0

आजरा (प्रतिनिधी) :

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी लोकांच्या मनात जे आहे की विद्यमान खासदारांना पराभूत करायचे, तेच आपण करणार आहे. त्यासाठी सर्वांनी प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहावे, असे जनतेला जाहीर आवाहन आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आजरा येथे केले. ते आजरा येथील टीम सतेजने उभारलेल्या सतेज स्पोर्टस क्लबच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. आचारसंहितेला सुरूवात झाल्यानंतर प्रथमच आ. बंटी पाटील यांनी मंडलिकांना विजयी करण्याचे खुले‍ आवाहन केल्याने कोल्हापूर लोकसभेचे रणांगण तापणार आहे. विशेष म्हणजे आ. पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर प्रा. मंडलिक हे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत. आ. पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. या जिल्ह्याने वाईट गोष्टींना कधीही थारा दिला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सार्‍यांनीच प्रा. मंडलिकांना सहकार्याची भुमिका घ्यावी.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, अभिषेक शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नॅशनल हेवीचे अध्यक्ष संग्रामसिंह नलावडे, सभापती रचना होलम, विष्णूपंत केसरकर, उपसभापती शिरिष देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, सुधीर देसाई, गडहिंग्लजचे उपसभापती विद्याधर गुरबे, शिवसेना संघटक प्रा.सुनील शिंत्रे, रविंद्र भाटले, मयुर डेळेकर, संदेश पाटील, श्रीपतराव देसाई, नगरसेवक किरण कांबळे, संभाजी पाटील, शकुंतला सलामवाडे, सुमैय्या खेडेकर, सीमा पोवार, एम. के देसाई, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन शिवाजी पारळे यांनी केले. आभार विक्रम पटेकर यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here